कोरोनाची संभाव्य तिसरी लाट.. लहान मुलांची कशी काळजी घ्याल.. अत्यंत माहितीपूर्ण… नक्की वाचा..

डॉ राजेंद्र कुलकर्णी, बाल आरोग्य तज्ज्ञ, नाशिक.
सध्या कोवीड १९ ची साथ चालू आहे. करोना या विषाणू मुळे होणाऱ्या आजाराला कोवीड१९ असे नाव आहे. या आजाराच्या साथीच्या या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये हा  आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक पालक अत्यंत भयग्रस्त आहेत. आणि ते स्वाभाविक आहे. कारण आपण बघतो, ऐकतो की या आजाराने अनेक जण गंभीर होत असून, क्वचित प्रसंगी मृत्युमुखी पडले आहेत.

खरे तर, एकूण जगाचा विचार करता आपल्या देशात या आजाराने मृत्यू झाल्याचे प्रमाण कमी आहे. कारण जागतिक पातळीवर मृत्यूचे प्रमाण एकूण बाधित रुग्णांच्या २.१५ टक्के असून आपल्या देशात ते १.२१ टक्के इतकेच आहे. अर्थात कुठलाही मृत्यू हा त्या कुटुंबासाठी भयानक आघात असतो. त्यामुळे ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

लहान मुलांना हा आजार होण्याचे प्रमाण जरी आता वाढत असले तरी  सुदैवाने मुलांमध्ये अत्यंत कमी तीव्रतेचा आजार साधारणपणे होतो.महाराष्ट्रात आजच्या घडीला (८/६/२०२१ पावेतो) एकूण बाधितांमध्ये दहा वर्षांच्या आतील मुलांचे प्रमाण३.११% इतके आहे.११ ते २० या वयोगटातील रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्ण संख्येच्या ७.१७% इतके आहे.मुलांना याची लागण घरातल्या आई, बाबा ,आजी ,आजोबा अशा प्रौढ लोकांकडून होतो. कारण मुले त्यांच्याच संपर्कात आहेत. ( शाळा बंद असल्याने इतरांशी संपर्क होत नाही.) त्यामुळे काही नेहमीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी हा लेखनप्रपंच.

मुलांची चाचणी केली पाहिजे का?
हो. घरातील एक व्यक्ती जर करोनाबाधित आढळली तर घरातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून घेणे गरजेचे असते. अगदी तान्ह्या बाळाला सुद्धा लागण होऊ शकते.
मुलांमधील आजाराची लक्षणे काय?
सर्वसाधारणपणे कुठल्याही फ्ल्यू सारखीच असतात. म्हणजे, सर्दी, ताप खोकला, घशात खवखव, जुलाब इ. बरीच मुले लक्षणविरहित देखील असतात.
मुलं गंभीर आजारी होऊ शकतात का?
अगदी क्वचित. सुमारे नव्वद ते ९५ टक्के मुलं दोन तीन दिवसात पूर्ण बरी होतात.बहुतांश मुले काही आठवड्यात बरी होतात.गंभीर आजारी होण्याची शक्यता १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. जर काही सहव्याधी नसेल तर रुग्णालयात दखल करण्याची गरज पडत नाही.

हे ही वाचा:  मोठी बातमी: यंदा पाऊस 106 टक्के बरसणार, IMD चा पहिला अंदाज !

मुलांमध्ये गंभीर स्वरूपाचा आजार कधी होऊ शकतो?
काही सहव्याधी म्हणजे, किडनी, यकृत, हृदय यांचा आजार, मधुमेह, स्थूलता,कुपोषण, कॅन्सर, प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे सुरू असणे इ., असल्यास अशा परिस्थितीत गंभीर स्वरूपाचा आजार होण्याचे प्रमाण अधिक असते.
मुलांचं विलगिकरणकसे करावे?
जर आई, वडील, आजी आजोबा असे कुणीही बाधित असतील तर त्यांच्या समवेत मुलांना राहू द्यावे. तसेच मुलं बाधित नसतील पण खूप लहान असतील तरीसुद्धा त्यांना बाधित पालकांसोबत राहू द्यावे. कारण त्यांना संसर्ग झाला असूनही चाचणीचा अहवाल नकारात्मक असू शकतो.
तान्ह्या बाळाला बाधित आईने अंगावर पाजावे का?
नक्कीच पाजावे.  आईच्या दुधातून हा विषाणू पसरत नाही. फक्त आईने तोंडाला मास्क लावून बाळाला सांभाळावे.

मुलांच्या आजाराला औषध आहे का?
लक्षण विरहित मुलांना काहीही औषधाची गरज नसते. सौम्य लक्षणे असल्यास साधे तापाचे, पॅरॅसिटॅमॉल चे औषध, डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावे. झिंक आणि जीवनसत्व दिल्यास हरकत नाही. अँटी फ्ल्यू, रेमडेसिविर किंवा स्टिरॉइड अशा औषधाची गरज सहसा नसते. ती फक्त रुग्णालयात दाखल रुग्णांनाच  दिली जाऊ शकतात.
मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे हे कसे ओळखावे?
ताप तीन चार दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास, श्वासा ची गती जास्त असल्यास, रक्तातील ऑक्सिजन चे प्रमाण ९४% पेक्षा कमी असल्यास, धाप लागत असेल किंवा बोलतांना दम लागत असेल तर जास्त तीव्र स्वरूपाचा आजार असल्याचे समजावे आणि ताबडतोब बालरोग तज्ज्ञ डॉ ना दाखवावे.

हे ही वाचा:  मोठी बातमी: यंदा पाऊस 106 टक्के बरसणार, IMD चा पहिला अंदाज !

मुलांमध्ये जर जास्त आजार होत नाही तर त्यांची तपासणी का करावी?
कारण, मुलं बाधित असल्यास त्यांना जास्त गंभीर स्वरूपाचा आजार होत नाही हे खरं असलं तरी  ती ‘ अती वाहक'(super spreader) असतात. मुले जोरात बोलतात, ओरडतात, रडतात किंवा शिकताना, खोकताना तोंडावर हात ठेवत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
करोना बाधित मुलांचा छातीचा स्कॅन किंवा रक्त तपासण्या कराव्यात का?
सिटी स्कॅन शक्यतो करावा लागत नाही. मध्यम किंवा अती तीव्र स्वरूपाचा आजार असेल तरच या तपासण्या कराव्या लागतात. खूप कमी वेळा या सगळ्यांची गरज पडते.  आणि ते तुमच्या बालरोग तज्ज्ञ डॉ ना ठरवू द्या.
मुलांसाठी कोरोनाविरोधी  लस उपलब्ध आहे का?
सध्यातरी नाही. काही देशात दहा ते पंधरा वर्षे या वयोगटात लसीच्या चाचण्या चालू आहेत.पण अजून त्याचे निष्कर्ष उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्यातरी मुलांना आजारी व्यक्ती चा संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याच बरोबर मुलांचे नियमित लसीकरण केले पाहिजे. कारण, या महामारी चे भीतीने, मुलांना बाहेर काढण्यास पालक घाबरतात आणि नियमित लसीकरण ( गोवर. कांजण्या, फ्ल्यू, न्युमोनिया इ.) पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतात. ते चूक आहे. असे लसीकरण थांबवू नका.

हे ही वाचा:  मोठी बातमी: यंदा पाऊस 106 टक्के बरसणार, IMD चा पहिला अंदाज !

शाळा सुरू कराव्यात का?
कोरोना आहे आणि तो कमी अधिक प्रमाणात काही वर्षे तरी राहणार आहे, हे वास्तव आपण स्वीकारायला हवे. आणि म्हणूनच आज ना उद्या शाळा सुरू कराव्या लागतील , कारण फक्त ऑनलाईन पद्धतीने शिकलं की शाळेचं काम संपत नाही. शाळेत मुलं खेळतात, भांडतात, पुन्हा एकत्र येतात, तडजोड करायला शिकतात, दुसऱ्या मुलांशी संवाद साधायला शिकतात, जुळवून घ्यायला शिकतात , त्यांच्या मनातील विचार मांडायला शिकतात, व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंना घडवण्याचं काम शाळेत होत. अशा असंख्य गोष्टींसाठी शाळा प्रत्यक्षात सुरू होण गरजेचं आणि शक्य आहे. त्यासाठी  काही गोष्टी सुचवू इच्छितो..

  • सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण झाले असावे.
  • भविष्यात लहान मुलांना कोरोना साठी लस देणे शक्य होईल तेव्हा ती ताबडतोब देणे.
  • मुलांचे मनावर  हाताची स्वच्छता, मुख पट्टी चा वापर आणि योग्य शारीरिक अंतर राखणे या गोष्टींचे भान आणि  महत्त्व बिंबवले गेले पाहिजे
  • एक दिवसाआड पटसंख्येच्या निम्मी मुले शाळेत बोलवावी आणि उर्वरित मुलांना ऑनलाईन शिकवावे. 

थोडक्यात , लहान मुलांमध्ये जरी करोना चा संसर्ग दिसून येत असला तरी घाबरून जाऊ नये. पण ,तुमच्या बाल रोग तज्ञांचा फोनवरून सल्ला घ्या. दवाखान्यात घेऊन  जातांना, रस्त्यात, दवाखान्यात त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ शकतो.म्हणून अत्यंत आवश्यक असेल  तेव्हा  दवाखान्यात घेऊन जा. तुमच्या बालरोग तज्ज्ञ डॉ ना विचारा आणि मगच दवाखान्यात जा.

कृपया काळजी करू नका, काळजी घ्या.
डॉ राजेंद्र कुलकर्णी, बाल आरोग्य तज्ज्ञ, नाशिक.
9823067946 drrajakulkarni@gmail.com

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790