नाशिक (प्रतिनिधी): शहरातील एका कॉर्पोरेट कंपनीच्या रुग्णालयाने अवास्तव बिल आकारल्याने नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ आल्यानंतर सत्ताधारी भाजपला खडबडून जाग आली असून, महापौर सतीश कुलकर्णी यांनी यापुढे जी रुग्णालये अवास्तव बिल आकारणी करतील, त्यांना टाळे ठोकण्याची घोषणा केली. नागरिकांनी तक्रार करण्यासाठी रामायण या महापौर बंगल्यामध्ये हेल्पलाइन केंद्र सुरू केले जाणार असून नागरिकांनी येथे तक्रारी कराव्यात, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, सभागृहनेता सतीश सोनवणे यांच्या उपस्थितीत मुख्य लेखापरीक्षक बी. जी. सोनकांबळे, वोक्हार्ट हॉस्पिटलसाठी नियुक्त असलेले लेखापरीक्षक तसेच हॉस्पिटलचे संचालक प्रतिनिधी यांच्यासमवेत चर्चा करून आम आदमी पक्षाचे जितेंद्र भावे यांनी दीड लाख रुपयांची अनामत रक्कम परत न केल्यामुळे कपडे काढो आंदोलन का केले याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेतली.
शहरातील काही कॉर्पोरेट कंपन्यांच्या हॉस्पिटलबाबत तक्रारी वाढत असून त्यामुळे संपूर्ण डॉक्टरांना बदनामीला सामोरे जावे लागत आहे. काही रुग्णालय निव्वळ पैसे कमवण्यासाठी उभी केली असा समज होत असून त्याला पूर्णविराम देणे गरजेचे असल्याचे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.