नाशिक (प्रतिनिधी): शहरातील डेंग्यूच्या रुग्णवाढीला आता सर्वसामान्य नागरिकांसह शासकीय, निमशासकीय कार्यालयांसोबतच बिल्डरही कारणीभूत असल्याचे चित्र आहे.
शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून महापालिकेला तंबी मिळाल्यानंतर आता महापालिकेचा मलेरिया विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे.
खाजगी आस्थापनांना नोटिसा पाठविण्याबरोबरच शासकीय कार्यालय सुद्धा रडारवर आली आहे. जवळपास ८५४ शासकीय आस्थापनांच्या प्रमुखांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
डेंग्यू रुग्णांची संख्या २६१ वर पोचली आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दखल घेताना महापालिकेला विविध उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डास उत्पत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने पूर्व, पश्चिम, सिडको विभागात महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून केलेल्या तपासणीमध्ये ८५४ जणांवर कारवाई करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.
शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन भवन, जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत, उपसंरक्षक पूर्व विभाग, बीएसएनएल कार्यालय, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गांधीनगर प्रेस, मुली आयटीआय,
स्काऊट गाइड कार्यालय, मुंबई नाका, रंगूबाई जुन्नरे स्कूल, रवींद्र विद्यालय, जनता विद्यालय, ठक्कर डेव्हलपर्स -येवलेकर मळा, हॉटेल मनोरत, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे कार्यालय, चिंतामणी प्राइड या भागातील छतावरील भंगार साहित्य हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.