नाशिक: CBS ला भरदिवसा 10 तोळे सोन्याची लूट; संशयित बॅग घेऊन पसार

नाशिक (प्रतिनिधी): सीबीएस हुतात्मा स्मारक परिसरातून दुचाकीवर आलेल्या संशयितांकडून सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे १० तोळे सोने असलेली बॅग ओरबाडून फरार झाले. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्याचा प्रयत्न केला.

पोलिस विभागाचे जुने नियंत्रण कक्ष गृह विभागाचे लिपिक मनोज महाजन एका खासगी बँकेत सोने तारण ठेवण्यासाठी सोमवारी (ता.१५) जात होते. तत्पूर्वी बँकेत बॉण्ड पेपर घेण्यासाठी जिल्हा न्यायालय समोरील हुतात्मा स्मारक परिसरात दुचाकी पार्क करण्यासाठी गेले.

हे ही वाचा:  नाशिक: चोरीच्या ४ मोटार सायकलसह २ चोरटे गजाआड

दुचाकी पार्क करत असताना लाल रंगाच्या पल्सर दुचाकीवर न्यायालयाच्या दिशेने दोघे संशयित त्यांच्या दिशेने आले. त्यांच्या दुचाकीच्या पुढे जाऊन त्यांनी त्यांची दुचाकी वळवून आणली. मागे बसलेल्या संशयिताने श्री. महाजन यांच्या हातातील काळ्या रंगाची बॅग ओरबाडून सीबीएस सिग्नलच्या दिशेने पळ काढला.

त्यांनी आरडाओरड केला, तोपर्यंत संशयित दिसेनासे झाले. त्यानंतर त्यांनी भद्रकाली पोलिस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. महाजन यांच्याकडून घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याचा खून करणाऱ्या संशयिताला कोठडी

त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी सायंकाळी अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दिवसाढवळ्या तेही सीबीएससारख्या गजबजलेल्या परिसरातून सोन्याचे दागिने असलेली बॅग संशयिताकडून ओरबाडल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790