सत्यजित शाह, नाशिक
सराफ बाजारात पाणी पुन्हा तुंबलं अशी हेडलाईन नेहमीच वाचायला मिळते. आणि दर वेळेस महापालिकेच्या नाला सफाईची पोलखोल अशा बातम्या समोर येतात.. १२ वर्षापूर्वी जो महापूर आला होता, त्यावेळेस संपूर्ण नाशिक हादरून गेलं होत. संपूर्ण सराफ बाजार आणि परिसर पाण्याखाली गेला होता. नदीकाठचा परिसर पूर्णतः पाण्याखाली होता… लगेच पुर रेषा लागू झाली. आजही हा नाशिककर पूररेषेच्या यातना भोगत आहे. पण आज पर्यंत काहीही उपाय योजना आली नाही….फक्त नाशिक स्मार्ट होण्याच्या दिशेने जात आहे. पूर रेषा ठेऊन नाशिक स्मार्ट होत आहे. आहे ना आश्चर्य..!
नाशिक महानगर पालिका आणि राज्य सरकार गेल्या १२ वर्षात पूररेषेबाबत फक्त जैसे थे परिस्थितीत आहे. नाशिकची मुख्य बाजारपेठ पूर रेषेत असूनही कोणत्याही अधिकारी ,प्रतिनिधी ,लोक नेते यांना प्रश्न सोडवता आला नाही,पण याचं भांडवल मात्र सर्वांनी करून घेतले… खरंतर जोरदार ,मुसळधार पाऊस आल्यानंतर सराफ बाजार कडे येणाऱ्या पाण्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.. यात सारडा सर्कल ,लोखंड बाजार ,दूध बाजार ,भद्रकाली आणि या सर्व ठिकाणचा आजूबाजूचा परिसर, एमजी रोड, फावडे लेन पासून रविवार कारंजा परिसर ह्या संपूर्ण परिसरातून येणारे पाणी दहिपुल चौकातून सराफ बाजारकडे जाते आणि परिणामी सराफ बजारकडून फक्त कापड बाजार भांडी बाजार या मार्गाने पाणी गोदावरी नदीत मिसळते..
पूर्वीच्या काळी सरस्वती नदी भद्रकाली परीसातून सराफ बाजार मार्गे गोदावरीत मिसळत होती पण आता त्या नदीचा पूर्णतः नाला झाला आहे. याला कारण महापालिकाच आहे असे म्हणावे लागेल. चांडवडकर लेन ते नेहरू चौक आणि नदीपर्यंत च रस्ता कॉक्रेतीकरण करताना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नसावी असे वाटत आहे. कारण दहीपुल आणि रमेश दुग्धलाय ह्या चौकाची लेवल अत्यंत खाली आहे. त्यानंतर कानडे मारुती चौकची उंची जास्त असल्याने त्या परिसरातील पाणी सुध्दा उलट दिशेने म्हणजे दहीपूल चौककडे येते.
कानडे मारुती चौकची लेवल उंच असल्याने चांदवडकर लेन मधून येणारे आणि भद्रकली येथून येणारे सर्व पाणी सराफ बाजारात घुसते….परिणामी सराफ बाजार जलमय होतो. गेल्या कित्येक दिवसांपासून ह्या परिसरात निव्वळ सर्वेक्षण होत आहेत. यावर उपाय म्हणजे कानडे मारुती चौकची उंची जर खाली केली तर चांदवडकर आणि भद्रकालीकडून येणारे पाणी ह्या दिशेस वळून सरळ नदीपर्यंत पोहोचू शकते.
सरस्वती नदी जिथे गोदावरीस मिळते त्याठिकाणी अत्यंत लहान पाइप असल्याने आउटलेट खूप कमी आहे. शिवाय शहर परिसरात पावसाळी गटार आणि अन्य गटार वेगवेगळी आहे का..? हा सुध्दा एक वेगळा विषय आहे …