नाशिक (विशेष प्रतिनिधी): शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्राला काँक्रीटमुक्त करण्याच्या कामाला पुन्हा एकदा खीळ बसली आहे. रोटेशन नसताना तसेच धरणात केवळ 36% पाणीसाठा असताना गोदावरीला पाणी सोडण्यात आले. काँक्रीटीकरण काढण्याचे काम थांबवण्यासाठीच धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचा आरोप गोदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी केला आहे.
गोदापात्रातील काँक्रीटीकरण काढण्याच्या कामास सोमवारी प्रारंभ झाल्यानंतर तब्बल १९ वर्षांनंतर गोदावरी तसेच पात्रातील १७ प्राचीन कुंड मोकळा श्वास घेण्याची चिन्ह निर्माण झाली होती.
पण अवघ्या काही तासातच या मोहिमेला खीळ बसली. सध्या गंगापूर धरणात ३६% पाणीसाठा आहे. तसेच जून महिन्यात रोटेशनचे वेळापत्रक ऑन रेकॉर्ड नाही. त्यातच अलीकडच्या काळात धरण क्षेत्रात पाऊस नाही. तरीसुद्धा गंगापूर धरणातून पाण्याच्या विसर्ग करण्यात आल्याचा आरोप जानी यांनी केला. काँक्रीटीकरणमुक्त गोदावरी नदी पात्राचे काम थांबवण्याचे पातक काही गोदा द्रोहींनी राजकीय दबाव आणून केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बिना परवानगी तथा रोटेशन मध्ये तरतूद नसतांना गंगापूर धरणातून रात्रीच्या वेळेस झालेल्या पाण्याचा विसर्गाची चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही देवांग जानी यांनी केली आहे. तसेच जर भविष्यात पाऊस लांबला तर नाशिककरांवर जल संकट येऊ शकते, अशी भिती व्यक्त करताना सदर पाणी हे पिण्यासाठी राखीव होते, याकडे लक्ष वेधले आहे.