नाशिक (प्रतिनिधी): शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा मागील दोन दिवसांमध्ये ७ टक्क्यांनी वाढला आहे. गुरुवारी (दि. २७) धरणात ६२ टक्के इतके पाणीसाठा नोंदविला गेला.
मात्र गेल्या वर्षाच्या आजच्या दिवसाच्या तुलनेत हा साठा आठ टक्क्याने कमीच असल्याचे आकडेवारीतून दिसते. गतवर्षी याचवेळी गंगापूरमध्ये शहरवासीयांसाठी ७० टक्के पाणी होते.
शहरात पाऊस होत नसला तरी धरणसमुह क्षेत्रात आणि इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या धरणांच्या तालुक्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे.
दारणा धरण ७६ टक्के भरल्याने परिचलन नियमाप्रमाणे त्यातून विसर्ग सुरू आहे. ४८७६ क्यूसेकने हा विसर्ग केला जात असून भावली तून २९० क्युसेक ने पाणी सोडले जात आहे. दुसऱ्या बाजूने त्र्यंबकेश्वरमध्ये होत असलेल्या पावसामुळे शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाची ही पाणीपातळी वाढत आहे.
गंगापूर धरणसमूहात ४९ टक्के साठा असून गेल्यावर्षी मात्र हा साठा ७९ टक्के इतका होता. म्हणजेच यावर्षी गंगापूर धरणसमूहात ३० टक्के कमी पाणी उपलब्ध असल्याचे पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीतून दिसते आहे.