नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): खोदकामात सापडलेली सोन्याची माळ भासवून नकली सोने विकणारी परप्रांतीय टोळीला शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करीत बेड्या ठोकल्या.
नकली ऐतिहासिक सोन्याचे नाणे, नकली सोन्याच्या माळा यासह मोबाइल, दुचाकी असा 1 लाख 62 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी संशयित राहत असलेल्या तवली फाटा परिसरातील पालातून (झोपड्या) जप्त केला आहे.
याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. दरम्यान, संशयितांनी एका उद्योजकासह आणखी दोघांना अशाचरितीने गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
मोहित कोतकर (रा. सातपूर एमआयडीसी) यांच्या फिर्यादीनुसार गेल्या बुधवारी दुपारी दोन संशयित त्यांच्याकडे आले आणि खोदकाम करत असताना जुने सोने सापडल्याचे सांगत ते कमी किमतीच विकायचे आहे, असे म्हणाले.
कोतकर यांनी संशयितांच्या आमिषाला भुलून त्यांनी सोन्याची माळ वीस हजार रुपयाला खरेदी केली. नंतर त्या माळा तपासल्या असता त्या माळी नकली सोन्याच्या असल्याचे स्पष्ट झाले.
अशाचप्रकारे संशयितांनी पंचवटीतील एकाला दोन लाखांना तर नाशिकरोड परिसरातील एकाला एका लाखांला गंडा घातला आहे.
शहर गुन्हेशाखेच्या युनिट १ चे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदिप भांड, महेश साळुंके, मिलींद परदेशी, विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, आप्पा पानवळ, राजेश राठोड यांनी तिघा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. संशयतांच्या चौकशीतून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी आहे.
अटकेतील संशयित:
केशाराम पिता सवाराम (रा. बागरियोका वास, रानीवाडा, जिल्हा- सांचोर, राज्यस्थान), बाबुभाई लुंबाजी मारवाडी (रा. आदीवाडा, मारवाडीवास, गांधीनगर, गुजरात), रमेशकुमार दरगाराम राह. पोलीस ठाणा- बागरा, पो.स्टे. बागराच्या मागे, तहसिल बागरा, जिल्हा- जालोर, राज्यस्थान) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. ते मूळचे राजस्थानातील असून महिनाभरापुर्वी आले असून, तवली फाटाच्या जवळील एका मोकळया जागी पालाच्या झोपडया उभ्या करून त्यात ते राहतात.
अशी आहे मोड्स ऑपरेंडी:
दिवसभर प्लॅस्टिक गोळा करण्याच्या बहाण्याने संशयित रेकी करून नागरिकांना हेरतात. सावज हेरल्यानंतर ते सुरवातीला त्यांच्याकडील १९०४ सालचे ऐतिहासिक नाणे विक्रीचा बहाणा करीत विश्वास संपादन करतात. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा खोदकामात सापडलेल्या सोन्याच्या माळा कमी किमतीत विकायचे सांगतात. त्यावेळी हात चालाखीने त्यांच्याकडचे असलेले खरे सोन्याचे दोन मणी त्यांना तपासणीसाठी देतात. माळा खऱ्या असल्याचा विश्वास होताच मिळेल त्या किमतीत नकली सोन्याच्या माळा विकून संशयित पसार होतात.