नाशिक। दि. २६ जून २०२५: अकरावी प्रवेशासाठी पहिल्या गुणवत्ता यादीसाठी प्रतीक्षा संपली असून, गुरुवारी (दि. २६) यादी प्रसिद्ध होणार आहे. त्या यादीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या नावासह कटऑफची आकडेवारीही कळणार आहे. त्यानंतर गुरुवारी (दि. २७) सकाळी १० पासून प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात केंद्रीय पद्धतीने अकरावी प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. तब्बल दोन वेळा वेळापत्रकात बदल करून लांबलेल्या प्रवेश प्रक्रियेत व्यवस्थापन कोटा नंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी (दि.२६) जाहीर होणार आहे. दि. १४ जून रोजी जाहीर झालेल्या कोट्याअंतर्गत प्रवेश झाले आहेत.
त्यानंतर विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा होती. पहिली प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालये प्राप्त झालेल्या यादीनुसार कोटानिहाय यादी विद्यालयस्तरावर प्रसिद्ध करत पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संपर्क केला. त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया पार पडल्यानंतर पहिल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीची सुरू असलेली प्रतीक्षा आता संपणार आहे.
यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संपर्क साधला जाणार असून, कॉलेजच्या नोटीस बोर्डावर प्रवेशासंदर्भात संपूर्ण तपशील जाहीर करण्यात येणार आहे. गुरुवारपासून (दि. २७) प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया राबविताना विद्यार्थ्यांनी कटऑफ लिस्टनुसार मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. ३ जुलै रोजी सायंकाळी ६ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. दि. ४ जुलै रोजी उरलेल्या जागांची माहिती पोर्टलवर अपडेट करून रिक्त जागांसाठी दुसऱ्या भागातील प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. उरलेल्या जागांवर त्यानंतर प्रवेश दिला जाईल.