नाशिक (प्रतिनिधी): संदर्भ सेवा रुग्णालयात करार पद्धतीवर कार्यरत महिलेस रुग्णालयात नियमित सेवेत समाविष्ट करून घेण्याचे आमिष दाखवत फसवणूक करण्यात आली.
वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ९५ हजाराची रक्कम महिलेकडून घेण्यात आली. भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार दर्शना गोखले संदर्भ सेवा रुग्णालयात करार पद्धतीवर नोकरीस आहे. त्यांनी मुख्यमंत्री यांना शासकीय ई-मेलवर नोकरीत नियमित समाविष्ट करण्यासंदर्भात अर्ज केला होता. त्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने ९ डिसेंबर २०२२ ला स्वतः मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक श्री. ठाकरे यांची भेट घेतली.
त्यांना विनंती अर्ज करत कागदपत्रांची फाइल दिली. त्यानंतर २९ डिसेंबर २०२२ ला त्यांना सुधाकर मोहिते नामक व्यक्तीचा फोन आला. मंत्रालयातून बोलत असल्याचे सांगून रुग्णालयातील सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करून घेण्यासंदर्भात माहिती मिळाली. तुम्हाला नोकरीत समाविष्ट करू शकतो असे आमिष दाखवले.
त्यांना शिक्षण व वैद्यकीय मंत्रालयातील अधिकाऱ्याचे आयडी कार्ड आणि स्वतःचे छायाचित्र त्यांच्या मोबाईलवर पाठवून विश्वास संपादन केला. काही दिवसांनी तुमचे काम लवकर होणार असल्याचे सांगून त्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याचे सांगितले. पैसे मागविण्यासाठी विजय थोरात नावाच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिला.
६ ते २० जानेवारी २०२२ दरम्यान वेळोवेळी ९५ हजारांची रक्कम संबंधित मोबाईल क्रमांकावर वर्ग केली. त्यानंतर बरेच दिवस होऊनही काम झाले नाही. त्यांनी संशयित मोहिते यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यांना संशय आल्याने ४ मार्च २०२३ त्यांनी स्वतः मंत्रालयात जाऊन चौकशी केली.
या नावाचा कुठल्याही व्यक्ती येथे काम करत नसल्याची माहिती समोर आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शनिवारी (ता. १९) भद्रकाली पोलिस ठाण्यात सुधाकर मोहिते आणि विजय थोरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.