नाशिक (प्रतिनिधी): मातोरी शिवारातील द्राक्ष मालाची खरेदी करीत पैसे न देता व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना ६५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणपत कारभारी ढबले (रा. मातोरी शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, फेब्रुवारी २०२१ ते २०२२ दरम्यान नौशाद मकसुद फारुकी, शमशाद दिलशाद फारुकी (दोघे रा. पखालरोड, नाशिक, मुळ रा. उत्तर प्रदेश) अशी संशयितांची नावे असून, या संशयितांनी ढबले यांच्यासह इतर शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून शिवार खरेदीप्रमाणे द्राक्षमाल खरेदी केला.
द्राक्षाचे पैसे धनादेशाद्वारे दिले. मात्र बँकेत धनादेश न वटल्याने शेतकऱ्यांचे ६५ लाख ८ हजार ९६१ रुपयांचे नुकसान झाले.
वारंवार मागणी करूनही फारुकी यांनी पैसे न दिल्याने शेतकऱ्यांनी नाशिक तालुका पोलिसांकडे तक्रार केली आहे, त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून याप्रकरणी दोघांविरोधात नाशिक तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]()


