नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कार्तिकी एकादशी अर्थात कोरड्या दिनाच्या पार्श्वभूमीवर परराज्यांतून विनापरवाना मद्यसाठा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्र्यंबक रोडवरील वाढोली येथे सापळा रचून एका ह्युंदाई कारसह 5 लाख 64 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतले, तसेच जिल्ह्यात अन्यत्र कारवाई करून एकूण 6 लाख 71 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क खात्याचे नाशिक विभागाचे उपायुक्त बी. एच. तडवी व अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वरजवळील वाढोली येथे सापळा रचण्यात आला होता. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक पांढरी ह्युंडाई आयटेन कार क्रमांक एमएच 43 बीके 0063 ही येताच या कारची झडती घेण्यात आली. या कारमध्ये इम्पिरिअल ब्ल्यू व्हिस्कीच्या 180 मिलि क्षमतेच्या 336 सीलबंद बाटल्या, मॅकडॉल व्हिस्कीच्या 336 बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 336 बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी संदीप भास्कर गायकर (वय 34, रा. नांदगाव बुद्रुक, ता. इगतपुरी) आणि वैभव भाऊसाहेब बोराडे (वय 28, रा. बोराडे मळा, पंचक, जेलरोड, नाशिकरोड) यांना अटक करून एकूण 5 लाख 64 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आणखी एका कारवाईत गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या मोटारसायकली अनुक्रमे एमएच 15 एचटी 3357 आणि एमएच 12 एचआर 8508 यांना अडवून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे 1 लाख 7 हजार रुपये किमतीची गावठी दारू आढळली. या प्रकरणी सुरेश काळू खांडके व (वय 27), व काळू चंदर मेंगाळ (वय 23, दोघेही रा. ठाकूरवाडी, ता. इगतपुरी) यांना अटक करण्यात आली आहे.
याप्रमाणे एकूण 6 लाख 71 हजार 640 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सुनील देशमुख, दुय्यम निरीक्षक पी. बी. ठाकूर, डी. ए. जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक व्ही. आर. सानप व जवान संतोष कडलग, अमित गांगुर्डे, दुर्गादास बावस्कर व राकेश पगारे यांनी यशस्वी केली. याबद्दल वरिष्ठांनी या पथकाचे अभिनंदन केले.