नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेकडून यंदादेखील पुष्पोत्सव प्रदर्शन भरविले जाणार आहे. साधारण फेब्रुवारीत उद्यान विभागाने पुष्पोत्सवाच्या तयारी केली आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिक व डेकोरेटर्स सहभागी होणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाने यांनी दिली आहे.
महापालिका हद्दीमध्ये १९९३ पासून पुष्पोत्सव आयोजन करण्याची परंपरा सुरू करण्यात आली.
२००८ पर्यंत ही परंपरा अपवाद वगळता अखंडितपणे सुरू होती. २००८ मध्ये नगररचना विभागात कोटेशन घोटाळा उघडकीस आल्यानंतर पुष्पोत्सवाची परंपरा खंडित झाली. २०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याचे सूचना दिल्या. मात्र त्यापूर्वी त्यांची बदली झाली.
तुकाराम मुंडे यांनी आर्थिक तरतूद नसण्याचे कारण देत पुष्पोत्सव भरविण्यास नकार दिला. त्यानंतर आयुक्त म्हणून आलेल्या राधाकृष्ण गमे यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये पुष्पगुच्छ आयोजन केले, तर २०२० मध्ये परंपरा कायम राहिली. मात्र कोरोनामुळे दोन वर्षे पुष्पोत्सव आयोजित करण्यात अडचणी निर्माण झाल्या.
मागील वर्षी पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला होता. ती परंपरा कायम ठेवत या वर्षीदेखील पुष्पोत्सव भरविला जाणार आहे. महापालिका मुख्यालयातील राजीव गांधी भवनच्या प्रांगणात तीनदिवसीय पुष्पोत्सव आयोजित केला जाणार आहे.
यात विविध प्रकारचे गुलाब पुष्पे, हंगामी फुले, पुष्परचना, मिनिएचर गार्डन, बोन्साय, कॅक्टस, फळे, भाजीपाला आदींचे स्पर्धात्मक प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक गटासाठी बक्षीसे ठेवली जाणार आहे. गुलाब राजा व गुलाब राणी हे मानाचे पारितोषिक ठेवले जाणार आहे. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.