नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सातपूर औद्योगिक वसाहतीतील नारंग कोल्ड स्टोरेजवर धाड टाकून लाखोंचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती सहआयुक्त संजय नारगुडे यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
प्रशासनाद्वारे नारंग कोल्ड स्टोअरेज या ठिकाणी धाड टाकून तपासणी केली असता, कुठलेही लेबल नसलेल्या, मार्च २०२३ पासून साठविलेल्या मिरची पावडर १०, १०८ किलो व धने पावडर ४,२७८ किलोचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त केला.
सदर साठा हा मे. जे. सी. शहा अँड कंपनी, द्वारका, या पेढीचा आहे. सदर प्रकरणी घेतलेले नमुने अन्न विश्लेषकास पाठविण्यात येत असून अहवाल आल्यावर नियमानुसार पुढील कार्यवाही घेण्यात येईल.
सदर कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी सहआयुक्त संजय नारगुडे तसेच सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड, मनीष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
भेसळयुक्त अन्नपदार्थांसंदर्भात तक्रार तसेच काही गोपनीय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनास त्वरित टोल फ्रि क्रमांकावर (१८००२२२३६५) संपर्क साधावा.