नाशिक (प्रतिनिधी): एकलहरेपासून जवळील सामनगाव शिवारातील जंगलात एका जुन्या घरात सुरू असलेला बनावट गुटखा निर्मितीचा कारखाना नाशिकरोड पोलिसांनी रात्रीच्या अंधारात छापा टाकून उद्ध्वस्त करण्याची धाडसी कामगिरी केली.
आतापर्यंत अवैध गुटखा विक्री होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवायांतून स्पष्ट झाले होते. परंतु, सामनगाव शिवारात नाशिकरोड पोलिसांनी केलेल्या कारवाईतून अवैध गुटखा निर्मितीचा कारखानाच सुरू होता ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.
या कारवाईत पोलिसांनी गुटखा निर्मितीसाठीची यंत्र सामुग्री, रसायने, चुना, कच्ची तंबाखू, सुपारी, गुलाबपाणी, रासायनिक पावडर, कात पावडर, सुगंधी द्रव्ये, प्रिंटर, पॅकिंग मशीन, वजनकाटा असा एकूण २ लाख १३ हजार ९२० रुपये किमतीचा साठा जप्त केला.
या कारवाईत गुटखा कारखान्यात अवैध गुटखा निर्मिती करणाऱ्या दिनेश बाबुलाल कुमार (वय ३५, रा. कानपूर उत्तर प्रदेश, सध्या रा. अरिंगळे मळा, सिन्नर फाटा), नीलेश दिनेश इंगळे (वय ३३, रा. अंबड) आणि दीपक मधुकर चव्हाण (वय ४५, रा. उत्तमनगर, अंबड) या तिघा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शेळके, पोलिस नाईक पुंडलिक ठेपणे, पोलिस शिपाई संतोष पिंगळ, पोपट पवार, अविनाश हांडे, बाळकृष्ण सोनवणे, ताज्कुमार लोणारी आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.