नाशिक (प्रतिनिधी): रशियातील किरगिस्तान येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुटीनिमित्त भारतात परतायचे होते. त्यासाठी त्याठिकाणी शिकणाऱ्या संशयिताने स्वस्तात विमान तिकीट काढून देण्याचे आमिष दाखवून ११ विद्यार्थ्यांना तब्बल सहा लाख ८६ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत संशयित विद्यार्थ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रतीक दादाजी पगार (रा. मोरे मळा, हनुमानवाडी, पंचवटी) असे संशयित विद्यार्थ्याचे नाव आहे. दिनेश सुभाष खैरनार (रा. साई शक्ती रो हाऊस, आनंदनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या मुलासह आणखी दहा मुले रशियातील किरगीस्तानात विविध शाखांत पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत.
या ठिकाणी संशयित प्रतीक पगार हाही शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता. सुट्या असल्याने या ११ विद्यार्थ्यांना भारतात परतायचे होते. त्यासाठी ते विमान तिकीट बुकिंगची चौकशी करीत होते.
त्या वेळी संशयित प्रतीक हा नाशिकचाच असल्याने आणि या विद्यार्थ्यांच्या आधी तो किरगीस्तानात शिक्षण घेत असल्याने त्याने या विद्यार्थ्यांना ‘मी स्वस्तात विमान तिकीट काढून देतो’ असे आमिष दाखविले होते.
विद्यार्थ्यांनी याबाबत पालकांशी संपर्क साधून सांगितले. त्यानुसार स्वस्तात विमान तिकीट मिळणार असल्याने संशयित पगार याने ११ विद्यार्थ्यांकडून सहा लाख ८६ हजार रुपये घेतले. परंतु, त्यानंतर त्याने या विद्यार्थ्यांना ना तिकीट दिले, ना पैसे परत केले.
याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता संशयिताने विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसात संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक उपनिरीक्षक राजपूत तपास करीत आहेत. संशयित प्रतीक हा नाशिकमध्ये आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.