नाशिक (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या स्वच्छ हवा अर्थात एन. कॅप योजने अंतर्गत नाशिक शहरात पहिल्या टप्प्यात वीस इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून या कामासाठी दिल्ली येथील कंपनी पात्र झाली आहे. दरम्यान तीन महिन्यात नाशिककरांच्या सेवेत चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध होणार आहे.
नाशिक शहरात इलेक्ट्रिक वाहनास पसंती देणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. ते पाहता नाशिक महापालिकेकडून चार्जिंग स्टेशन्सची कामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान गेल्या वर्षांपासून स्टेशनचे काम रखडले होते. शहरात एकूण १०६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स उभाररली जाणार आहे. मागील एक वर्षांपासून रखडलेल्या ई चार्जिंग स्टेशन उभारणी कामाला मुहूर्त लागल्यानंतर या कामास सुरवात झाली आहे.
प्रारंभी महावितरणकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी अडचणी आल्या. आतापर्यंत तीन स्टेशनला महावितरणकडून परवानगी मिळाली असून उर्वरीत स्टेशनसाठी लवकरच परवानगी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरात वीस स्टेशन उभारले जात असून त्यासाठी साडेसात कोटी खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारच्या एन कॅप योजनेअंतर्गत (राष्ट्रिय स्वच्छ हवा कार्यक्रम) हा खर्च केला जात आहे.