मुंबई। दि. १० जुलै २०२५: भारत निवडणूक आयोगाने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत 334 नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 9 पक्षांचा समावेश आहे.
सध्या देशात ६ राष्ट्रीय पक्ष, ६७ प्रादेशिक पक्ष आणि २८५४ नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष (RUPPs) आहेत. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत नोंदणी करताना पक्षांनी नाव, पत्ता, पदाधिकारी यांची माहिती द्यावी लागते, तसंच 6 वर्षे सलग निवडणूक न लढवल्यास नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आयोगाकडे आहे.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, या निर्णयाने प्रभावित कोणताही पक्ष 30 दिवसांच्या आत या निर्णयाविरोधात अपील करू शकतो. हा निर्णय निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सक्रिय राजकीय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
महाराष्ट्रातील ९ पक्षांची मान्यता रद्द:
भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील (१) अवामी विकास पार्टी, (२) बहुजन रयत पार्टी, (३) भारतीय संग्राम परिषद, (४) इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, (५) नव भारत डेमोक्रॅटिक पार्टी, (६) नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी, (७) पिपल्स गार्डियन, (८) दि लोक पार्टी ऑफ इंडिया आणि (९) युवा शक्ती संघटना या राजकीय पक्षाची नोंदणी रद्द केली आहे.