नाशिक (प्रतिनिधी): कोरोना लसीबाबत सुरुवातीपासूनच नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा असताना,सिडकोतील एका ज्येष्ठ नागरिकाने लस घेतल्यानंतर हाताच्या दंडावर लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत मात्र हा संशोधनाचा विषय असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार (वय ७१) यांनी कोरोनाच्या कोविडशिल्ड लसीचा दोन दिवसांपूर्वी दुसरा डोस एका खासगी हॉस्पिटलमध्ये घेतला. त्यांचा मुलगा जयंत हा बातम्या बघत असताना कोरोनाबाबत लोखंडाच्या वस्तू चिकटत असल्याचे त्याला समजल्यावर त्याने वडिलांना तुमच्या हाताला वस्तूची चिकटतात का? म्हणून वस्तू लावून बघितल्या तर आश्चर्य असे की खरोखरच वडिलांच्या हाताला लोखंडाच्या व स्टीलच्या वस्तू पैसे, चमचे चिकटत असल्याचे निदर्शनास आले.
मात्र या घटनेचा लसीकरणाशी संबंध जोडू नये असं महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटलंय. डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, “लसीकरणाचा या गोष्टीशी संबंध जोडणं संपूर्पणे चुकीचं आहे. शरीराला चुंबकत्व निर्माण होणं आणि लसीकरणाचा काहीही संबंध नाही. आपण कोटी लोकांचं लसीकरण केलं असल्याने हे त्याच्याशी संबंधित नाही.”
डॉ. लहाने पुढे म्हणाले, “मुळात लोखंडाच्या वस्तू शरीराला चिटकतात याबाबत आपण यापूर्वी ऐकलं आहे. आणि अशा प्रकारच्या चर्चा होत असतात. मात्र यावर संशोधन केलं असता वैज्ञानिकदृष्ट्या याला पुरावा नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे जर कोणाला असं काही होत असेल तर त्यांनी डॉक्टरांची मदत घ्यावी. याचा लसीकरणाशी तीळमात्र संबंध नाही.”
दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाने सोनार यांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी केली. लस घेतल्यामुळे हा प्रकार होत असल्याचा दावा त्यांनी सुद्धा फेटाळला आहे. त्यानंतर सोनार यांच्या रक्ताचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, त्याचे अहवाल आल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा होईल.