नाशिक (प्रतिनिधी): कोरोना कोविड -१९ मुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन आहे.त्यामुळे रोजगारावर परिणाम झाला असून जे नागरिक भाड्याने घरात राहतात त्यांचे घर भाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी व त्यांना घरांमधून निष्कासित करू नये असे शासनाचे निर्देश असून त्यानुसार असलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना कोविड -१९ साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर झालेले आहे.सद्यस्थितीत हे लॉक डाऊन हे ३ मे २०२० पर्यंत राहणार आहे.
यामुळे सर्व बाजारपेठा,व्यावसायिक संस्था कारखाने व एकूण सर्व आर्थिक व्यवसायिक संस्था,कारखाने बंद आहेत. या सर्व आर्थिक/व्यवसायिक गतीविधी बंद आहे.याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारावर परिणाम झालेला असून अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे या अभूतपूर्व परिस्थितीमुळे सर्वसामान्य जनतेला कोविड-१९ रोगाच्या समस्या बरोबर अत्यंत कठीण अशा आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नाशिक शहरात भाड्याच्या घरामध्ये राहणार्या लोकांचे प्रमाण लक्षणीय असून आर्थिक अडचणीच्या परिस्थितीमुळे भाडेकरूंना ते राहत असलेल्या घराची भाडे नियमित भरणे शक्य होत नाही व भाडे वाढत आहे ही वस्तुस्थिती असल्याने बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये घरमालकांनी घर भाडे वसूली किमान तीन महिने पुढे ढकलावी व या कालावधीत वेळेवर भाडे न आल्याने किंवा भाडे थकल्याने कोणताही भाडेकरूंना भाड्याच्या घरांमधून (काढून)निष्कासित करण्यात येऊ नये अश्या शासनाच्या सूचना असून त्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन आयुक्त राधाकृष्ण यांनी केले आहे.