नाशिक: 18 जिल्ह्यांत डिझेल, पेट्रोल पुरवठा विस्कळीत:72 तासांनंतर सुरळीत होणार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मनमाडजवळ नागापूर येथील इंडियन ऑइल कंपनीच्या इंधन साठवणूक प्रकल्पात शुक्रवारी पहाटे जादा दाबाने इंधन आल्यामुळे डिझेल पाइपलाइन फुटली व त्यातून मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मोठ्या प्रमाणावर गळतीमुळे आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी पहाटेपासून राज्यांत प्रामुख्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यासह एकूण १८ जिल्ह्यात इंडियन ऑइल प्रकल्पांतील टँकरद्वारे वितरित होणाऱ्या डिझेल व पेट्रोल वाहतुकीवर व वितरणावर विपरीत परिणाम झाला आहे.

बराच काळ संपूर्ण इंधन वितरण ठप्प झाले होते. ४८ ते ७२ तासात ते टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

याबाबतची माहिती अशी की, मनमाड येथून ५ किलोमीटरवरील नागापूर इंडियन ऑइल इंधन प्रकल्पात गुरुवारी रात्री जादा दाबाने इंधन आल्याने पाइपलाइन फुटली व मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याने परिसरात ते पसरले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही गळती झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता हा प्रकार समजल्यानंतर त्याबाबत तातडीने प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आली.

दरम्यान, या परिसरात सर्वत्र इंधन पसरल्याने पेट्रोल-डिझेलचा वास येतो. तसेच तेथील जमिनीतही इंधन झिरपल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, या प्रकल्पात अंतर्गत गोपनीयता असल्याने व्यवस्थापनाने अधिकृत माहिती दिली नाही.

प्रत्यक्षदर्शी म्हणतात, १० ते १५ मीटर फवारे उडाले:
इंडियन ऑइलमध्ये पाइपलाइनद्वारे डिझेल घेण्यात येत असताना अति दाबामुळे पाइपलाइन फुटली व गळती झाली. १० ते १५ मीटर इंधनाचे फवारे उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यापूर्वीही काही वर्षांपूर्वी अशी गळती झाल्यानंतर तेथील नाल्यात व नदीत हे इंधनाचे मिश्रण एकत्रित झाले. तेथील विहिरी व त्यातील पाण्यावर इंधनाचे थर आले होते तर काही भागातील उभ्या पिकाचेही नुकसान झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांत घबराट व भीतीचे वातावरण कायम आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790