नाशिक (प्रतिनिधी): शहरातील महिला, मुलींना अधिक सुरक्षितता वाटावी आणि रोडरोमिओ, टवाळखोरांना धडा शिकविण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत दामिनी मार्शल्स सज्ज झाले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयात दामिनी मार्शल्सला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.
दामिनी पथकाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी, मोनिका राऊत यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.
अल्पवयीन बेपत्ता मुला-मुलींच्या शोधासह इतर महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथकांच्या जोडीला आता शहरात महिला दामिनी बीटमार्शल्स सज्ज आहेत.
आयुक्तालयातील १४ पोलीस ठाण्यांतर्गंत महिला अत्याचार, गुन्ह्यांना आळा घालण्यासह, टवाळखोरांवर कारवाईसाठी पोलीस ठाणेनिहाय दामिनी मार्शल्स २४ तास तैनात राहणार आहे.
‘दामिनीं’ची दुचाकीवरून गस्त:
दामिनी मार्शल्समध्ये ४४ महिला पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी ११ मोटारसायकलीवरून आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दामिनी मार्शल्स नियमित गस्तीवर राहतील. यावर परिमंडळीय उपायुक्तांचे नियंत्रण असणार आहे.
करडी नजर:
शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, बाजारपेठा, महिला वसतीगृहे, सिनेमा हॉल, उद्याने याठिकाणांसह महिला, मुलींची छेडछाडीच्या ठिकाणी रोमरोमिओ, टवाळखोरांवर कारवाई करणार आहे. तसेच, टवाळखोरांचा शोध घेऊन त्यांचे चित्रीकरणही केले जाईल. तक्रारदारांनीही टवाळखोरांबाबत दामिनी पथकाला माहिती कळविण्याचे आवाहन शहर आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.