नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर पोलीस आयुक्तालय आणि सायबर पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या वतीने ‘सायबर दूत’ प्रशिक्षित करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेदरम्यान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली भीष्मराज हॉल, पोलीस मुख्यालय येथे सायबर दूत प्रशिक्षित करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये नाशिक शहरातील विविध शाळा व कॉलेजमधील शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
सायबर दूतचे प्रशिक्षण घेण्यासाठी शहरातील विविध शाळा आणि कॉलेजेसमधून १० ते १५ विद्यार्थी असे सायबर जनजागृती कार्यशाळेत एकूण ३०० शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
सायबर जनजागृती कार्यशाळेत सहभागी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी सायबर दूतचे कामकाज कसे करावे याबाबत सायबर सायबर तज्ञ् अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षित सायबर दूत यांना नाशिक शहरातील नागरिक, शाळा आणि कॉलेजेसमधील इतर विद्यार्थी यांना सायबर जनजागृती करून त्यांना साक्षर करण्यासाठी लागणारे साहित्य पुरविण्यात येणार आहे. तसेच सायबर दूत यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र आणि ‘सायबर दूत’चा बॅच देण्यात येणार आहे, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी दिली.
सायबर दूतचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जनजागृतीकरिता पुढीलप्रमाणे मदत करणे अपेक्षित आहे.
- स्वत: सायबर शिक्षित होऊन समाजातील इतर घटकांना सायबर साक्षर करणे.
- सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करणे.
- विविध ठिकाणी सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करून व्याख्यान देणे.
- सायबर गुन्ह्यांना बळी पडलेल्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन करणे तसेच त्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी त्यांना मदत करणे.