Crime News: नांदूर शिंगोटे सशस्त्र दरोडा प्रकरणी ७ जणांना अटक; ९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

नांदूर शिंगोटे सशस्त्र दरोडा प्रकरणी ७ जणांना अटक; ९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर येथील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. २४ ऑक्टोबर रोजी नांदूरशिंगोटे गावात अज्ञातांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी यातील सात संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे नांदूरशिंगोटे येथील दरोड्यासह तब्बल सहा गुन्हे उघडकीस आले आहे…

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदूरशिंगोटे गावातील रहिवासी संतोष गंगाधर कांगणे व साक्षीदार रमेश तुकाराम शेळके यांच्या घरामध्ये अज्ञातांनी दरवाजाचे कुलूप तोडुन आत प्रवेश केला. त्यांनतर लोखंडी पहार व चाकूचा धाक दाखवून काठीने मारहाण करून लाकडी बेडमध्ये ठेवलेले सुमारे १३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम २ लाख ७५ हजार असा एकूण ६ लाख ९२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकत लंपास करण्यात आला होता.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांनी तात्काळ दरोडा पडलेल्या घटनास्थळास भेट देऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, व वावी पो.स्टे.चे सहा. पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या पथकाने या गुन्हयातील घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली.

संशयितांच्या अंगावरील कपडे व वर्णनाप्रमाणे तसेच गुन्हा करण्याच्या पध्दतीवरून गोपनीय माहिती घेऊन तपास पथके रवाना करत सापळा रचण्यात आला. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी राजदेरवाडी, ता. चांदवड येथून संशयित १) रविंद्र शाहू गोधडे (१९, रा. राजदेरवाडी, ता. चांदवड, जि. नाशिक) २) सोमनाथ बाळु पिंपळे (२०, रा. मनमाड फाटा, लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक) ३) करण नंदू पवार (१९, रा. इंदिरानगर, लासलगाव, ता. निफाड), ४) दिपक तुळशीराम जाधव (रा. चंडिकापुर, वणी, ता. दिंडोरी) यांना ताब्यात घेतले. संशयितांची चौकशी केली असता त्यांनी दिवाळीच्या दिवशी पहाटेच्या सुमारास त्यांच्या साथीदारांसह नांदूरशिंगोटे येथील वरील दरोडयाचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्यांच्याकडून सोन्याचे नेकलेस, लक्ष्मीहार, गंठन, पॅन्डल, कानातले वेल, सोन्याची चैन, अंगठी, डोरले, नथ, झुबे, पोत असे एकूण १२७ ग्रॅमचे ५ लाख ६९ हजार ९७० रुपयांचे सोन्याचे दागिने, तसेच ०८ मोबाईल फोन, ०५ मोटर सायकली असा एकूण ९ लाख २ हजार ४४५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यातील संशयित हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नाशिक ग्रामीण जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांना जबरी चोरी, चोरी, घरफोडी असे गुन्हे दाखल आहेत. या संशयितांनी दरोड्यासह सिन्नर व बारामती पोलीस ठाणे हद्दीत मोटर सायकल चोरीचे काही गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांचेकडुन घरफोडी, चोरी व दरोडयाचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

निफाड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि सागर शिंपी, सपोनि मयुर भामरे, वावी पोलीस ठाण्याचे सपोनि सागर कोते यांच्या स्था.गु.शा.चे सपोउनि ज्ञानदेव शिरोळे, पोहवा रविंद्र वानखेडे, जालिंदर खराटे, नवनाथ सानप, दिपक आहिरे, पोना विनोद टिळे, सुशांत मरकड, सचिन पिंगळ, विश्वनाथ काकड, प्रितम लोखंडे, सागर काकड, मंगेश गोसावी, संदिप लगड, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम तसेच पोहवा उदय पाठक, वसंत खांडवी, नामदेव खैरणार, भगवान निकम, प्रशांत पाटील, गणेश वराडे, सतिष जगताप, नवनाथ वाघमोडे, वावी पोलीस ठाण्याचे पोउनि गवळी, पोउनि सोनवणे, पोउनि तांदळकर, सपोउनि अढांगळे, पोहवा बैरागी, मोरे, पोना जगताप, चव्हाणके शिंदे, पोका मोंढे, जाधव, तांबे, आडके यांनी दोन दरोडे, एक घरफोडी व तीन मोटर सायकल चोरी असे एकूण ०६ गुन्हे उघडकीस आणले. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास २५ हजार रुपयांचे बक्षीस देवून त्यांचे अभिनंदन केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790