नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता राज्य शासन सदैव कटीबद्ध! – गिरीष महाजन

नाशिक (प्रतिनिधी): राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी सातत्याने नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक नवीन संकल्पना राबवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असून त्यांचे काम अभिनंदनीय आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता राज्य शासन सदैव कटीबद्ध आहे, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतीराज, पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण ग्रामविकास व पंचायतीराज, पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी श्री महाजन बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शहाजी उमाप,नाशिक  महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपायुक्त (सा. प्र.) रमेश काळे व आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन पुढे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक शूरवीरांनी प्राणांची आहुती दिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशासह महाराष्ट्रात आणि आपल्या नाशिक मध्येही क्रांतीकारक घडना घडल्या. स्वातंत्र्य संग्रामात नाशिक जिल्ह्यातील वीरांची भूमिका महत्वाची आहे.  स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे नाशिकचे भूषण आहे. त्याचप्रमाणे येवला येथील जन्मभूमी असलेले तात्या टोपे, कलेक्टर जॅक्सनची विजयानंद थिएटरमध्ये हत्या करणारे हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या सारख्या जिल्ह्यातील ज्ञात व अज्ञात असलेल्या क्रांतिकारांचे बलिदान आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे श्री महाजन म्हणाले.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमा अंतर्गत नाशिक जिल्ह्यात साधारण 11 लाख लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये अनुकंपा तत्वावर पाचशे पेक्षा अधिक उमेदवारांना शासकीय सेवेत समावेश करून नियुक्ती पत्रे देण्यात आली असल्याचेही मंत्री श्री महाजन यांनी सांगितले.

जिल्हा पुरवठा विभागाकडून शासन आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत 101 शिबिरांमधून बारा हजार 445 नवीन व दुय्यम शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले असून यामुळे एकूण 54 हजार 470 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. तसेच जिल्ह्यातील 84 शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून दररोज साधारण 11 हजार लाभार्थ्यांना केवळ 10 रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. बळीराजाचे नैसर्गिक व आर्थिक संकटांपासून संरक्षण करण्याच्या हेतूने 2023-24 या वर्षाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत केवळ 1 रुपयात पीक विमा संरक्षण देण्यात आले आहे. आपल्या जिल्ह्यातून पाच लाख 87 हजार 67 शेतकरी बांधवांनी या योजनेत सहभाग नोंदवून आपला जिल्हा नाशिक विभागात अग्रस्थानी आहे.  यासाठी शेतकरी बांधवांचे व कृषी विभागाचे मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले.

ते पुढे म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सदैव तत्पर असते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सायबर गुन्हेगारी विषयी जागरूकता निर्माण करण्याकरीता ‘सायबर दूत’ संकल्पना पोलीस यंत्रणा राबवित आहे. या अंतर्गत 1014 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विकसित करण्याऱ्या योजनेच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या 128 शाळांना मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीच्या इयत्ता 11 वी विज्ञान शाखेतील निवडक विद्यार्थ्यांना नियमीत अभ्यासक्रमासोबत सीईटी, जेईई या व्यवसायिक प्रवेश परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी ‘सुपर फिफ्टी’ नाविन्यपूर्ण उपक्रम राविबण्यात आला होता. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून यावर्षी पन्नास ऐवजी 100 विद्यार्थ्यांची निवड या उपक्रमात करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत 112 पैकी 40 प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र करण्यासाठी पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आली आहे.        

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

टंचाईग्रस्त गावे टँकरमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिशन भगीरथ प्रयास ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यात एकूण 609 मंजूर सिमेंट बंधाऱ्यांपैकी 155 बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील नाशिक, कळवण व मालेगाव या तालुक्यात जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग, आरोग्य विभाग व रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पात्र दिव्यांग व्यक्तिंना कृत्रिम अवयव व साधन सहाय्य करण्यासाठी अयोजित शिबिरांमधून त्यांना कृत्रिम अवयव व साधन सहाय्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिंना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ‘रियल टाइम’ या वेबसाईटच्या माध्यमातून ग्रामपंचायत निहाय सर्वेक्षण करण्यात येत असून यात कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही, याबाबत विशेष दक्षता घेण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

देशात गोबरधन प्रकल्प सुरू करण्यात आले असून आपल्या जिल्ह्यात येवला तालुक्यातील अंदरसूल ग्रामपंचायतीमध्ये पहिला गोबरधन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील  जैविक कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती करण्यात येणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी व नदी प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने निफाड तालुक्यातील चांदोरी, चाटोरी, सायखेडा व करंजगाव येथे ‘टाकाऊ मधून टिकाऊ’ वस्तू बनविण्यासाठी नदीत वाढणाऱ्या पाणवेलींपासून हस्तकलेच्या वस्तू बनविण्यासाठी स्वयंसहायता गटांच्या महिलांना प्रशिक्षण दिल्याने त्या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यभरात 20 हजार पेक्षा जास्त पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यामध्ये आपल्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने साधारण एक हजार 38 पदांसाठी पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन , श्री महाजन यांनी केले.

लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी नागरिकांना आपल्या संविधानाने मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नवमतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजविण्यासाठी नाव नोंदणी करावी. तसेच विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग होण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मंत्री श्री.महाजन यांनी केले.

कार्यक्रमास यावेळी स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार, युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामविकासमंत्री यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790