मुंबई (प्रतिनिधी): अवघ्या सहा तासांमध्ये झालेल्या तब्बल 300 मिलिमीटर पावसाने मुंबई शहराची घडी विस्कटून टाकली आहे. अवघ्या काही तासांच्या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा आणि रस्ते वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. पुढील काही तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तसेच आज दुपारी १.५७ वाजता समुद्रात भरती आहे. यावेळी समुद्रात ४.४० मीटर उंचीच्या लाटा उसळतील. या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात आली आहे.
सततच्या पावसामुळे मुंबईच्या आकाशातील दृश्यमानता कमी झाली आहे. याचा परिणाम मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीवरही झाला आहे. आतापर्यंत जवळपास 27 विमानांच्या दिशा बदलण्यात आल्या आहेत. ही सर्व विमानं मुंबईऐवजी अहमदाबाद, हैदराबाद आणि इंदौरच्या दिशेने वळवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.