नाशिक: स्वयंपाक करतांना गॅस सिलिंडरचा स्फोट; आईसह तीन मुले भाजली

Breaking: स्वयंपाक करतांना गॅस सिलिंडरचा स्फोट; आईसह तीन मुले भाजली

नाशिक (प्रतिनिधी): स्वयंपाक करीत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घरावरील पत्रे उडाल्याने आईसह तीन मुले गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी नाशिकरोडला नारायण बापूनगर येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, की नारायण बापूनगर येथे लोखंडे मंगल कार्यालयासमोर पुंजाजी लोखंडे यांच्या मालकीची पत्र्याची चाळ आहे.

या चाळीतील खोल्यांमध्ये अनेक भाडेकरी राहतात. त्यात मोलमजुरी करणार्‍या भाडेकरूंचा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय, आदिती तटकरे यांची पोस्ट नेमकी काय?

आज सकाळी या चाळीतील एका घरामध्ये सुगंधा सोळंकी (वय २४) ही महिला मुलांना शाळेत जायचे असल्याने त्यांना चहापाणी व जेवणाचा डबा तयार करून देण्याच्या कामात असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.

या स्फोटामुळे घरावरील पत्रे उडाले, तसेच स्फोटामुळे लागलेल्या आगीत सुगंधा सोळंकी या ५० टक्के भाजल्या असून, त्यांची मुले रुद्र (वय ५) हा १५ टक्के भाजला आहे, तर आर्यन व सूर्या ही दोन मुले पाच टक्के भाजली आहेत. लोखंडे चाळीत स्फोट झाल्याची माहिती कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या महिलेसह तिच्या मुलांना प्रथम बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्हास्तरीय समरसता साहित्य संमेलनाचे आज (दि. २२) आयोजन

महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला तिच्या मुलांसह जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज सकाळी साडेआठच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी शिंगाडा तलाव येथे असलेल्या अग्निशमन दलाच्या केंद्रास फोनद्वारे कळविली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली.

🔎 हे वाचलं का?:  पंचवटी: रामकालपथाच्या कामासाठी 'या' वाहतूक मार्गात महत्वाचे बदल

अग्निशमन दलाचे कर्मचारी सुभाष निकम, शांताराम गायकवाड, रामदास काळे, मनोज साळवे, श्रीकांत नागपुरे व अशोक मोदीयानी यांच्या पथकाने मदतकार्य करून आग आटोक्यात आणली. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले. यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790