नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): रिक्षातून प्रवास करणाऱ्या काही नागरिकांना रिक्षाचालकांच्या मुजोरपणाचा अनुभव येत असतो. त्यातही बहुतेक रिक्षाचालकांच्या अरेरावी वा रिक्षाभाड्यातून लुटमारीचा अनुभव अनेकांना येतो.
परंतु त्यातही काही रिक्षाचालक हे आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करीत असल्याचाही काही प्रवाशांना अनुभव आहे. असा अनुभव सातपूरच्या एका प्रवासी महिलेला आला.
रिक्षाप्रवासात विसरलेली त्यांची बॅग रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे त्यांना परत केली. त्यामुळे सातपूर पोलिसांनी प्रामाणिक रिक्षाचालकाचा सन्मान करीत गौरविले.
सुजाता डेसले (रा. अशोकनगर, सातपूर) या गेल्या रविवारी (ता.१७) शहरात काही कामानिमित्ताने आलेल्या होत्या. सायंकाळी सहा वाजता त्या सातपूरला परत जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानक येऊन सातपूरला जाणाऱ्या रिक्षात (एमएच १५ जेए २४७२) बसल्या.
यावेळी त्यांच्याकडे बॅग होती. ती त्यांनी पाठीमागे ठेवली. बॅगेमध्ये महत्त्वाची कागदपत्रे आणि सोन्याचे काही दागिने होते. अशोकनगर येथे त्या रिक्षातून उतरल्या. उतरताना त्यांना त्यांची बॅग घेण्याचे लक्षात राहिले नाही.
प्रवासभाड्याचे पैसे दिल्यानंतर रिक्षाचालक पुढे निघून गेला. काही मिनिटे घराच्या दिशेने जात असताना त्यांना आपली बॅग रिक्षातच विसरून राहिल्याचे लक्षात आले. त्या पुन्हा धावत-पळत रिक्षाथांब्याजवळ आल्या.
परंतु रिक्षाचालक निघून गेलेले होते. त्यामुळे त्यांनी लागलीच अशोकनगर पोलीस चौकी गाठली. त्यासाठी पोलीस अंमलदार सागर गुंजाळ होते, त्यांना घडलेली माहिती सांगितली.
त्यांनी तातडीने परिसरात असलेल्या रिक्षा शोधत, एकाठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजही तपासले. परंतु त्यात रिक्षाचा क्रमांक दिसत नव्हता.
दुसऱ्या दिवशी, सकाळी पुन्हा सुजाता डेसले यांनी अशोकनगर रिक्षा थांबा परिसरात येऊन रिक्षाचालकाचा शोध घेतला. काही वेळाने तीच रिक्षा त्यांच्यासमोर येऊन उभी राहिले.
रिक्षाचालक श्रीकांत हिरे यांनी रिक्षातून उतरून त्यांना ‘ताई, तुम्हीच काल माझ्या रिक्षात बॅग विसरला होता ना, ही तुमची बॅग. त्यातील सामान पाहून घ्या. आहे तशीच ठेवली होती’ असे सांगत त्यांना त्यांची बॅग परत केली.
बॅग परत मिळाल्याचा त्यांना अत्यानंद झाला. ही बाब अशोकनगर पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार सागर गुंजाळ यांना देण्यात आली.
प्रामाणिक रिक्षाचालकाचा गौरव:
घटनेची माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना कळताच सुजाता डेसले आणि रिक्षाचालक श्रीकांत हिरे यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. सदरची बॅग रिक्षाचालक हिरे यांच्या हस्ते सुजात डेसले यांना परत करण्यात आली. तसेच, पोलीस निरीक्षक भालेराव यांच्या हस्ते प्राणाणिकपणा दाखविल्याबद्दल रिक्षाचालक श्रीकांत हिरे यांचा सत्कार करीत त्यांना गौरविण्यात आले.
“रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणामुळे महिलेस त्यांची बॅग परत मिळाली. असा प्रामाणिकपणा समाजात क्वचित अनुभवयास मिळतो. त्याबद्दलच रिक्षाचालक श्रीकांत हिरे यांचा सत्कार करण्यात आला. अशा व्यक्तींमुळे समाजात प्रामाणिकपणा टिकून आहे.” – पंकज भालेराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातपूर पोलीस ठाणे.