राम आएंगे! डोळे दिपवणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे अवघ्या जगाचं लक्ष

अयोध्या धाम (प्रतिनिधी): अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे तास उरले आहेत. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर सत्यात अवतरलं आहे. आज याच भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, आज पहाटे श्रीरामाची वर्षानुवर्षांपासून अयोध्येत असलेली मूर्ती राम मंदिरात आणण्यात आली आहे. गाभाऱ्याचे द्वार खुले करण्यात आले आहेत. प्रभू श्रीरामाच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी नववधूप्रमाणे सजली आहे.

अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर अखेर सोमवारी प्रभू श्री राम त्यांच्या नव्या, भव्यदिव्य महालात विराजमान होणार आहेत. आज रामललाच्या श्री विग्रहाचा अभिषेक करण्याचा ऐतिहासिक विधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत समाज आणि विशेष लोकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. हजारो क्विंटल फुलांनी अयोध्या नगरी सजवण्यात आली आहे. उत्सवाचं वातावरण आहे. अयोध्या धामसह देशभरातील मंदिरांमध्ये राम संकीर्तन आणि राम चरित मानसाचे पठण केलं जात आहे.

दरम्यान, राममंदिर परिसरात चैतन्याचं आनंदाचं वातावरण आहे. अयोध्येत सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे. कारण सर्वांच्या लाडक्या रामरायाची आज प्राणप्रतिष्ठा होणारेय. आज 12 वाजून 29 मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, आणि ज्या मंदिरात हा महन्मंगल सोहळा संपन्न होणार आहे. त्या नव्याकोऱ्या मंदिरालाही सजावटीचा साज बहाल झालाय. राम मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोनावर आकर्षक फुलांची सजावट केली गेलीय. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीने वातावरण राममय झालं आहे.

प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचा मुहूर्त काय? :
सोमवारी (22 जानेवारी) राम मंदिराच्या गर्भगृहात दुपारी 12:15 ते 12:45 या वेळेत प्रभू श्रीरामाचा अभिषेक होण्याची शक्यता आहे. राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचा शुभ मुहूर्त 84 सेकंदांचा आहे, जो 12:29 मिनिटं 8 सेकंदापासून सुरू होईल आणि 12:30 मिनिटं 32 सेकंदांपर्यंत असेल. याच वेळेत प्रभू श्रीरामाचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. 23 जानेवारीपासून भाविकांसाठी मंदिर दर्शनाची वेळ सकाळी 7 ते 11.30 आणि नंतर दुपारी 2 ते 7 अशी असेल. राम मंदिरात सकाळी साडेसहा वाजता सकाळची आरती होईल, ज्याला शृंगार किंवा जागरण आरती म्हणतात. यानंतर दुपारी भोग आरती आणि सायंकाळी साडेसात वाजता संध्या आरती होईल. आरतीला उपस्थित राहण्यासाठी पास आवश्यक असेल.

सर्वात आधी नित्यपूजा, हवन पारायण, नंतर देवप्रबोधन, त्यानंतर प्रतिष्ठा पूर्वाकृती, नंतर देवप्राण प्रतिष्ठा, महापूजा, आरती, प्रसादोत्सर्गा, उत्तरांगकर्म, पूर्णाहुती, आचार्यांचं गोदान, कर्मेश्वरपण, ब्राह्मण भोजन, प्रशात्का, ब्राह्मण पुण्य, दान, दान, पूजन असे कार्यक्रम होतील. इत्यादी संकल्प, आशीर्वाद आणि मग कर्म पूर्ण होईल.

प्राणप्रतिष्ठापनेसाठी 22 जानेवारीचाच दिवस का?:
सोमवार 22 जानेवारी रोजी शुभ मृगाशिरा नक्षत्र पहाटे 3 वाजून 52 मिनिटांनी सुरु होणार आहे. तसेच मंगळवार 23 जानेवारीला पहाटे 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त कायम राहणार आहे. परंतु 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजून 51 मिनिटे आणि दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. त्यामुळे 22 जानेवारी 2024 चा मुहूर्त हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790