लक्षणांशिवाय वाढणारे आजार: भारतात ‘सायलेंट हेल्थ क्रायसिस’चा इशारा- अपोलो हॉस्पिटलचा ‘हेल्थ ऑफ द नेशन 2026’ अहवाल

देशातील नागरिकांमध्ये आरोग्याचे धोके कमी वयात सुरू होत असून ते दीर्घकाळ कोणतीही लक्षणे न दाखवता शरीरात वाढत असल्याचे चिंताजनक वास्तव अपोलो हॉस्पिटल यांनी जाहीर केलेल्या हेल्थ ऑफ द नेशन 2026’ (HoN 2026) अहवालातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या या अहवालात सन 2025 दरम्यान अपोलो नेटवर्कमध्ये करण्यात आलेल्या 30 लाखांहून अधिक प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

या अहवालानुसार, देशात तीनपैकी दोन तरुणांमध्ये असंसर्गजन्य आजारांचा (NCD) धोका आढळत असून, कामकाजी लोकांपैकी जवळपास निम्मे प्रीडायबेटीस किंवा डायबेटीसग्रस्त आहेत. तसेच १० पैकी ८ जण जादा वजनाचे (Overweight) असल्याचेही स्पष्ट झाले आहे. महिलांमध्ये ऍनेमिया आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढत असून, व्हिटॅमिन D व B12 ची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील स्थितीही तितकीच चिंताजनक असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्यात १६.५ टक्के नागरिक मधुमेही, १९.२ टक्के लोक उच्च रक्तदाबग्रस्त, तर २०.७ टक्के लोक ऍनेमिया ग्रस्त असल्याचे आढळले आहे. याशिवाय तब्बल ८०.९ टक्के नागरिक जादा वजनाचे किंवा स्थूल असल्याचे दिसून आले असून, ६३.८ टक्के लोकांमध्ये रक्तातील चरबीचे वाढलेले प्रमाण आढळले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ६७२ कोटींची भांडवली मदत; पुनरुज्जीवनाला गती

नाशिकमधील आकडेवारीदेखील धक्कादायक आहे. तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांपैकी १६.७ टक्के जण मधुमेहग्रस्त, तर १७.३ टक्के लोकांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे. तसेच २३.३ टक्के नागरिकांमध्ये रक्ताची कमतरता (ऍनिमिया ) आढळून आली आहे. शहरातील ७६.८ टक्के लोक जादा वजनाचे किंवा स्थूल (Obese) असल्याचे समोर आले असून, ४५.९ टक्के नागरिकांमध्ये रक्तातील चरबीचे असंतुलन (Dyslipidemia) आढळले आहे.

तरुण आणि कार्यरत वयोगटातही आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ३० वर्षांखालील प्रत्येक पाचपैकी एक व्यक्ती पूर्व-मधुमेही (Prediabetic) अवस्थेत असून, योग्य वेळी उपाययोजना केल्यास सुमारे २८ टक्के लोकांमध्ये सुधारणा होऊ शकते. नौकरदार वर्गात (सरासरी वय ३८ वर्षे) ८० टक्के लोक जादा वजनाचे (Overweight) असून, जवळपास ५० टक्के जण डायबेटीस किंवा प्रीडायबेटीसग्रस्त आहेत, तर २५ टक्के लोकांना उच्च रक्तदाब असल्याचे दिसून आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन विभाग थकबाकीदारांना ‘एआय’च्या माध्यमातून पाठविणार संदेश

महिलांच्या आरोग्याबाबतही काही चिंताजनक बाबी पुढे आल्या आहेत. महिलांमध्ये ऍनेमियाचे प्रमाण अधिक असून, ४० वर्षांवरील ३५९ महिलांपैकी एकामध्ये स्तनाचा कर्करोग आढळून आला असून, अनेक प्रकरणांमध्ये कोणतीही प्रार्थमिक लक्षणे नव्हती.

अहवालात काही आजार ओळखण्यासाठी सविस्तर प्रगत तपासण्यांचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले आहे. फॅटी लिव्हर असलेल्या ७४ टक्के रुग्णांमध्ये प्रार्थमिक लिव्हर टेस्ट सामान्य आढळली, तर ४५ टक्के लोकांमध्ये कमी वयातच हृदयविकाराचा धोका दिसून आला. तसेच आतड्यांच्या आरोग्यातील बिघाडामुळे मेटाबॉलिक आजारांचा धोका वाढत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

“देशाची खरी ताकद लोकांच्या आरोग्यावर अवलंबून आहे. आरोग्य तपासणी ही केवळ औपचारिकता नसून ती वैयक्तिक आणि सक्रिय असणे आवश्यक आहे,” – डॉ प्रताप रेड्डी (संस्थापक अध्यक्ष, अपोलो हॉस्पिटल)

“महिलांचे आरोग्य मजबूत असेल तर समाज आणि अर्थव्यवस्था दोन्ही सक्षम होतात” – डॉ. संगिता रेड्डी (जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर, अपोलो हॉस्पिटल)

महिलांचे आरोग्य एक आरोग्यदायी परिवार आणि समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीचे एक मानक आहे म्हणून आरोग्यतपासणी महत्वाची आहे – डॉ प्रिथा रेड्डी (एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअरपर्सन, अपोलो हॉस्पिटल)

नियमित फॉलोअप आणि उपचार केल्यास आरोग्यात सुधारणा शक्य असल्याचेही या अहवालातून दिसून आले आहे. ५६ टक्के रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब सुधारला, ३४ टक्के रुग्णांमध्ये डायबेटीस नियंत्रणात आला, तर २६ टक्के लोकांनी वजन कमी केले. त्यामुळे तपासणी आजार शोधते, मात्र त्यावर योग्य वेळी कृती करणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचा संदेश या अहवालातून देण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात 9 मे रोजी होणार लोक अदालत

हा अहवाल अपोलो हॉस्पिटल्सच्या EMR डेटा, AI विश्लेषण, क्लिनिकल तपासण्या आणि फॉलोअप अभ्यासांवर आधारित आहे. १९८३ मध्ये स्थापन झालेल्या अपोलो हॉस्पिटल या संस्थेकडे सध्या देशभरात ७६ रुग्णालये, १०,४०० हून अधिक बेड, ७,००० हून अधिक फार्मसी, ३०० हून अधिक क्लिनिक्स आणि २,४०० हून अधिक डायग्नोस्टिक सेंटर्स आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790