नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात आता दररोज साधारण ८०० ते हजार लोकांच्या अँटिजेंन टेस्ट करण्यात येणार आहेत. यामुळे रुग्णांची संख्या वाढल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. नाशिक शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने या अँटिजेंन टेस्ट करण्यात येणार आहेत.
नाशिक शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्याच्यावर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने शहरातील पूर्व,पश्चिम, पंचवटी,नाशिकरोड, नवीन नाशिक व सातपूर या सहा विभागीय कार्यालयांतर्गत असणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रात प्राधान्याने अँटिजेंन टेस्ट केल्या जाणार आहेत. दररोज साधारण ८०० ते १ हजार इतक्या नागरिकांची अँटिजेंन तपासणी केली जाणार असून यामध्ये रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्याच्या दृष्टीने महापालिका स्तरावर उपाययोजना केल्या जात असून त्या अनुषंगाने व्यवस्था पुरेसे बेड उपलब्ध करण्यात आलेले आहेत. या तपासणीच्या माध्यमातून रुग्ण मिळून आल्याने त्वरीत त्यावर उपचार सुरु करुन प्रादुर्भाव टाळण्यासाठी मदत होणार आहे. यामध्ये रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे त्यावर उपाययोजना सुरू असून संख्या वाढत असल्याने कुणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन मनपाच्या वतीने मा.मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केलेले आहे.