मुंबई (प्रतिनिधी): बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती येत आहे.
ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून अक्षय शिंदे यानं स्वतःवर तीन गोळ्या स्वतःवर झाडून घेतल्या, अशी माहिती सुरुवातीला येत होती. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र हा मृत्यू आत्महत्या नसून एन्काऊंटर असल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या, असं अपेडट सोमवारी रात्री साडेसात वाजता हाती आलं आहे.
या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्यालादेखील गोळी लागल्याची सूत्रांची माहिती आहे. ‘साम टीव्ही’ने हे वृत्त दिले आहे.
नेमकं काय घडलं?: बदलापूरमध्ये शिशु वर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच अत्याचार झाला. शाळेत कर्मचारी असलेला अक्षय शिंदे याला पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली. मात्र या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले आणि २० ऑगस्ट रोजी शाळा परिसर तसेच रेल्वे स्टेशन मध्ये १० तास रेल रोको आंदोलन झाले. शेवटी या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली व फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालविण्याचे काम सुरु करण्यात आले. खटला सुरु असलेल्या कल्याण न्यायालयमध्ये एका विशिष्ठ रूममध्ये पीडित तीन आठवड्यांपूर्वी मुलींसमोर आरोपीची ओळख परेड पार पडली.
विशेष म्हणजे नॉन रिफ्लेक्टेड काचेच्या माध्यमातून ही ओळख परेड झाल्याने पीडित मुलगी आरोपीला पाहू शकत होती, मात्र आरोपीला पीडित मुलगी दिसत नव्हती. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ओळख परेड दरम्यान पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती.
दरम्यान, याप्रकरणी विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले असून अक्षय शिंदे पोलिसांकडे असलेली बंदूक हिसकावत होता तोपर्यंत पोलिस काय करत होते? अक्षय शिंदेच खरंचं एन्काऊंटर झालं का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या प्रकरणी संशय उपस्थित करुन कसून तपास करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आरोपीच्या पूर्व पत्नीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. त्यामुळे चौकशीसाठी वॉरंट घेऊन त्याला नेलं जात होतं. त्याचवेळी अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर आणि हवेमध्ये फायरिंग केलं. फडणवीस पुढे म्हणाले, अक्षयने बंदुकीतून फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या.”