नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय,नवी दिल्ली त्रिसदस्यीय विशेष पथकाने नाशिक येथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे अशा सूचना यावेळी या केंद्राच्या विशेष पथकाने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
नाशिकमध्ये आलेल्या पथकामध्ये ई.एम.आर.नव्वी दिल्लीचे संचालक डॉ.पी रविंद्रण, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि सल्लागार डॉ. सुनिल खापरडे,आय,डी,एस.पी. नवी दिल्लीचे डॉ.संकेत कुलकर्णी यांचा समावेश होता. त्रिसदस्यीय पथकामध्ये राज्य सर्विलेंन्स अधिकारी आय.डी.एस.पी यांचा देखील सहभाग होता. या पथका समवेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक महानगरपालिका आयुकत कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य उपसंचालक पी.डी.गांढाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्रीनिवास, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.
केंद्राच्या या विशेष पथकाने जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षाची, कोविड प्रयोगशाळेची पाहणी केली. रुग्णांचे व्यवस्थापन, रुग्णांशी संवाद, मनुष्य बळाची माहिती, आरटीपीसीआर लॅबचे व्यवस्थापन या विषयी पथकाने निरिक्षण करुन संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आयसोलेशन व क्वारंटाईन नियमांचे कोरोनाबाधित रुग्णाला काटेकोर नियम पालन करण्याच्या सूचना देण्यात येवून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी दिल्यात.
कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांची पडताळणी व तपासणी त्वरीत करण्यात यावी. कोरोना रुग्णाचा मृत्यु झाल्यास मृत्युच्या कारणांचे पुर्नविलोकन करण्यात यावे. लग्न समारंभ, राजकिय मेळावे, सामाजिक जमाव या मध्ये कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचनेचे काटेकोन पालन करण्याच्या सूचनाही केंद्रीय पथकाने दिल्या.
कोरोना आजाराच्या व्यवस्थापनावर केंद्रीय पथकाने व्यक्त केले समाधान
नाशिक जिल्ह्यात कोरोना संदर्भांतील मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी, काटेकोर रुग्ण व्यवस्थापन, उत्तम रुग्ण पडताळणी, हॉटस्पॉट व्यवस्थापन व पाहणी या विषयी केंद्रीय पथकाने प्रशंसा करुन समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी वर्षे भरात जिल्ह्यातील कोरोना आजाराच्या अनुषंगाने केलेल्या कामाचा गोषवारा सादर केला. तसेच सप्टेंबर महिन्यात झालेली रुग्णवाढ आणि त्या अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शकसूचनेप्रमाणे प्रभावी अंमलबजावणी करुन व नियंत्रणात आणलेली कोरोनाच्या साथीचा आलेख यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी मांडला.