नाशिक (प्रतिनिधी): शहरातील वाहतुकीला सर्वाधिक अडथळा बेशिस्त रिक्षांचा होतो. चौकांमध्ये बेशिस्तपणे पार्किंग केली जाते. यामुळे वाहतूक विभागाने विशेष मोहिमेंतर्गत मंगळवारी (ता.२३) बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात धडक कारवाईचा बडगा उगारून १६० केसेस केल्या. यातून वाहतूक शाखेने सुमारे ७९ हजार ३०० रुपयांचा ऑनलाइन इ-चलानद्वारे दंड आकारला आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे बेशिस्त रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत. शहर पोलिस वाहतूक शाखेकडून आयुक्तालय हद्दीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या अंतर्गत मंगळवारी वाहतूक शाखेने बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाई केली.
वाहतूक शाखेच्या चारही विभागांत रिक्षा परवाना नसणे, गणवेश नसणे, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी, फ्रंटसिट प्रवासी, नो-पार्किंगमध्ये रिक्षा पार्किंग, वाहतुकीला अडथळा करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक शाखेने ऑनलाइन इ-चलानद्वारे दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सुरू आहे.
विनाहेल्मेटच्या २०५ केसेस:
शहर वाहतूक पोलिस शाखेने विनाहेल्मेट, सिटबेल्ट न वापरणाऱ्या कारचालकांविरोधातही दंडात्मक कारवाई केली आहे. त्यानुसार, विनाहेल्मेटच्या २०५ केसेस करीत १ लाख २ हजार ५०० रुपयांचा दंड तर, विना सिटबेल्टच्या ६८ केसेस करीत १३ हजार ६०० रुपयांचा दंड इ-चलानद्वारे आकारला. एकूण २७३ केसेसमधून वाहतूक शाखेने १ लाख १६ हजार१०० रुपयांचा दंड आकारला आहे.