Breaking

नाशिक: फरार असलेला संशयित जेरबंद; अपघाताचा बनाव रचून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): कोट्यवधींची अपघाती विम्याची रक्कम हडप करण्यासाठी अपघाताचा बनाव करून विमाधारकाचाच खून २०२१ मध्ये खून करण्यात आला होता. मात्र याप्रकरणातील एक संशयित दोन वर्षांपासून पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

त्या संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने गजाआड केले आहे. उदय रामेश्वर वाघमारे (२०, रा. वैष्णव रोड, पंचवटी) असे जेरबंद करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

मयत अशोक सुरेश भालेराव (४६, रा. भगूर रोड) यांचा २ सप्टेंबर २०२१ च्या मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ खून करून अपघाताचा बनाव संशयितांनी रचला होता.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात सुरुवातीला अपघाताचा व नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी रजनी कृष्णदत्त उके, मंगेश बाबुराव सावकार, दीपक अशोक भारुडकर, किरण देविदास शिरसाठ, हेमंत शिवाजी वाघ व प्रणव राजेंद्र साळवे (सर्व रा. नाशिक) यांना अटक करण्यात आली होती. परंतु संशयित उदय वाघमारे हा तेव्हापासून फरार होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात मतदार यादी शुद्धीकरणासाठी आज (दि. ३१) विशेष मोहिम

दरम्यान, युनिट एकचे अंमलदार विशाल देवरे यांना सदरील गुन्ह्यातील फरार उदय वाघमारे हा पंचवटीतील गाडगे महाराज पुल परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून उदय यास शिताफीने जेरबंद करण्यात आले आहे.

पथकाचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, अंमलदार प्रविण वाघमारे, नाझीम पठाण, देवरे, विशाल काठे, आप्पा पानवळ, महेश साळुंके, राजेश राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरात 'हे' दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार… जाणून घ्या सविस्तर…

उदयचा सक्रिय सहभाग:
सदरच्या खुनाच्या गुन्ह्याच्या पोलिस तपासामध्ये भालेराव यांचा खून करण्यात वाघमारेचा सक्रीय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.

भालेराव यांना मारहाण करण्यात मंगेश सावकारसह उदयही होता. संशयितांची धरपकड केली असता, त्यावेळी उदय मुंबईला असल्याने तो तेथूनही फरार झाला होता. त्यानंतर तो गुजरात, मध्यप्रदेशात वास्तव्यास होता.

असा होता बनाव:
पोलिसांच्या माहितीनुसार, अशोक भालेराव यांनी स्वत:च्या नावे साडेचार कोटींचा विमा काढला होता. त्यानंतर स्वत:च्या जागी दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह दाखवून विम्याचे पैसे लाटण्याचा डाव भालेराव व त्याच्या संशयित सहकाऱ्यांनी रचला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील रस्त्यांच्या कामांमुळे २५ सिटीलिंक बसफेऱ्यांच्या मार्गात बदल

मात्र त्यांचा हा बेत फसल्याने संशयितांनी भालेराव यांचाच खून करून अपघाताचा बनाव रचण्याचा कट आखला. त्यानुसार संशयितांनी सप्टेंबर २०२१ मध्ये मुंबईहून आलेल्या भालेराव यांचा जॉगिंग ट्रॅकजवळ टणक हत्याराने डोक्यात मारून खून केला.

त्यानंतर भालेराव यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचला. सुरुवातीस मुंबईनाका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

मात्र डिसेंबर २०२२ मध्ये विम्यातील आलेल्या पैशांच्या वाटणीवरून नाराज झालेल्या संशयितांच्या टोळीतील महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर भालेराव यांच्या खुनाचा उलगडा झाला होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790