नाशिक: सख्खा शेजारीच झाला वैरी- ‘या’ कारणामुळे केला बाप आणि लेकाचा खून
नाशिक (प्रतिनिधी): हरविलेल्या पिता-पुत्राचा खुन झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
खून झालेले नानासाहेब कापडणीस हे शिक्षण तज्ञ होते तर त्यांचा मुलगा हा डॉक्टर होता.
याबाबत माहिती देताना परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दि. २८ जानेवारीला श्रीमती शितल नानासाहेब कापडणीस, (वय २८, रा. पवई, मुंबई, मुळ रा. पंडीत कॉलनी) यांनी समक्ष येवून त्यांचे वडील नानासाहेब रावजी कापडणीस (वय ७०) व भाऊ अमित नानासाहेब कापडणीस (वय ३५, दोन्ही रा. ३, गोपळ पार्क, जुनी पंडीत कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक) हे हरविले आहे असे पोलिसांना सांगितले. नंतर सरकारवाडा पोलीस ठाणे येथे दोघे हरविल्याची तक्रार दिली. त्याचा तपास सपोनि यतीन पाटील यांच्याकडे देण्यात आला.
तपासा दरम्यान नानासाहेब कापडणीस यांचे बँक खाती, शेअर मार्केट, डिमॅट खाते व इतर आर्थिक व्यवहारासंबंधी चौकशी करण्यात आली. त्यात असे निदर्शनास आले की, नानासाहेब कापडणीस यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेबाबत त्यांच्या बाजुच्या बिल्डींग मध्ये राहणारा संशयित राहुल जगताप याने बरीच माहिती मिळवून कापडणीस यांचे शेअर्स विक्री करून खात्यामध्ये जमा रकमा काढल्याचे निदर्शनास आले.
पुढे अधिक तपास केला असता कापडणीस यांच्याशी निगडीत बाबीच्या अनुषंगाने तांत्रिक पुरावा व विश्लेषनाच्या आधारे आर्थिक फायदा करून घेण्याच्या उद्देशाने राहुल जगताप यानेच नानासाहेब कापडणीस यांचा काहीतरी घातपात केल्याचे निष्पन्न होताना दिसून आले. त्यानुसार जगताप याचा मॅनजर प्रदिप जगन्नाथ शिरसाठ याचेकडे देखील चौकशी केली असता त्याचे बँकेच्या खात्यावर नानासाहेब कापडणीस यांचे खात्यावरून रक्कम आरटीजीएसद्वारे वर्ग झाली असून ही रक्कम राहुल गौतम जगताप याने वर्ग केली असल्याचे पोलिसांना सांगितले.
त्यावर राहुल जगताप यास ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाणे येथे त्याची सखोल चौकशी केली असता त्याने कबुल केले की, पैश्यांच्या हव्यासापोटी व मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने त्यानेच डिसेंबर २०२१ च्या मध्यावधीत नानासाहेब रावजी कापडणीस यांचा खून करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे. त्यानंतर ७ ते ८ दिवसांनी अमित नानासाहेब कापडणीसचा खून करून त्याच्या देखील मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे. नंतर पोलिसांनी त्याच्यावर आज सरकारवाडा पोलीस ठाण्यात भादंविक ३०२, २०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी राहुल गौतम जगताप, वय ३६, रा. १७, अनिता अपार्ट, आनंद गोपळ पार्क, जुनी पंडीत कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक) यास अटक केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे हे करीत आहे.
पोलिसांना या खुनाची कोणतीही माहिती समजू नये म्हणून आरोपी जगतापने एक मृतदेह हा पालघर जिल्ह्यातील घाटांमध्ये तर दुसरा मृतदेह हा नगर जिल्ह्यातील घाटामध्ये नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
तपासा दरम्यान पोलीस पथकाने नानासाहेब कापडणीस यांचा मृतदेह जेथे टाकण्यात आला ते ठिकाण निष्पन्न करून मोखाडा पोलीस ठाणे जिल्हा पालघर येथे भादंविक ३०२,२०१ प्रमाणे दाखल गुन्हा हो उघडकीस आला आहे. तसेच अमित नानासाहेब कापडणीस याचा मृतदेह जेथे टाकण्यात आला ते ठिकाण निष्पन्न करून सदरबाबत राजुर पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर येथे भादंविक ३०२,२०१ प्रमाणे दाखल गुन्हा हा उघडकीस आला आहे. या दोन्ही गुन्हयातील पुरावे व कागदपत्रे वर्ग करण्यात येणार आहे. यातील हरविलेले पिता नानासाहेब कापडणीस हे शिक्षण तज्ञ होते त्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयात मध्ये काम केलेले आहे तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव होते तर त्यांचा मुलगा अमितने एमबीबीएस पर्यंत शिक्षण घेतले होते. 2009 पासून तो वैद्यकीय क्षेत्रात काम करत नव्हता परंतु तो डॉक्टर झालेला होता.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना, वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.