नाशिक: प्रेयसीने पेट्रोल टाकून जाळलेल्या ‘त्या’ प्रियकराचा उपचारादरम्यान मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): आई- वडिलांनी निश्चित केलेल्या मुलाशी लग्न मोडल्याच्या रागातून प्रेयसीने कुटुंबीयांच्या मदतीने प्रियकराला शुक्रवारी (दि.११) पेट्रोल ओतून जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता.
यात गंभीर भाजलेला प्रियकर गोरख बच्छाव याचा रविवारी (दि.१३) रात्री १० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
देवळा पोलिस ठाण्यात या प्रकरणी संशयित प्रेयसी कल्याणी, तिचे वडील गोकुळ सोनवणे आणि तिच्या दोन भावांसह नातेवाइकांवर खुनाच्या गुन्ह्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील गोरख आणि कल्याणी सोनवणे यांचे प्रेमसंबध होते. दोघे लग्नही करणार होते. मात्र या लग्नास कल्याणीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. कल्याणीला पाहुणे पाहण्यास आले होते. मात्र तिच्या प्रेमसंबंधाबाबत माहिती मिळाल्याने पाहुणे निघून गेले. याबाबत जाब विचारण्यास आलेल्या संशयितांनी गोरखला शुक्रवारी (दि.११) मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी तो एका मोबाइल दुकानात घुसला, मात्र संशयितांनी लोखंडी रॉडने गोरखच्या डोक्यावर वार केले. गोरख रस्त्यावर पडलेला असताना त्याची प्रेयसी कल्याणीने दुचाकीमधून पेट्रोल काढून गोरखच्या अंगावर टाकले. काडी पेटवून त्याला पेटवून दिले. पोलिसांनी संशयितांना त्याच दिवशी अटक केली होती.
![]()


