नाशिककरांनो, दुचाकीवर जाणार असाल तर हेल्मेट घालूनच बाहेर पडा.. आजपासून कारवाई सुरु…
नाशिक (प्रतिनिधी): हेल्मेट परिधान न केलेल्या वाहनधारकांविरोधात पोलिसांकडून आज, गुरुवार (दि. २०) पासून थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
हेल्मेट नसल्यास ५०० रुपये दंड तर दुसऱ्यांदा विना हेल्मेट आढळल्यास १००० रुपये दंड व वाहन परवाना निलंबित करण्यात येणार आहे.
शहरात अचानकपणे तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
शहरातील लहान-मोठ्या अपघातांची सख्या लक्षात घेता पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांनी दुचाकीधारकांना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे केले आहे. वाहनधारकांनी नियमित हेल्मेट परिधान करावे यासाठी सुरुवातीला ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांचे ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क येथे दोन तासाचे समुपदेशनही करण्यात आले.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9765,9767,9762″]
हेल्मेट नसलेल्यांना खासगी व शासकीय कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. मात्र तरीही हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनधारकांविरोधात थेट दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. गुरुवार (दि. २०) पासून ठिकठिकाणी अचानकपणे वाहनधारकांची तपासणी केली जाणार आहे. हेल्मेट नसल्यास वाहनधारकांवर थेट दंडात्मक कारवाई हाेणार असल्याने हेल्मेट परिधान करावे असे आवाहन वाहतूक पाेलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.