नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० फेब्रुवारी २०२२ ला घेण्यात येणार होती.
मात्र, या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती.
या विहित मुदतीत आता ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने २० फेब्रुवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी व आठवीची २०२२ मध्ये होणारी शालेय शिष्यवृत्ती परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेचे नियमित शुल्कासह आवेदनपत्र भरण्यासाठी १५ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ज्या शाळांनी अद्याप आॅनलाइन आवेदनपत्र भरले नसतील, त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर आॅनलाइन किंवा आॅफलाइन आवेदनपत्र शुल्क स्वीकारले जाणार नाहीत, असेही परीक्षा परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने २० फेब्रुवारीला होणाऱ्या या परीक्षेच्या आयोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नसल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच शिष्यवृत्ती परीक्षेची सुधारित तारीख प्रसिद्ध केली जाईल, असेही परीक्षा परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी आता ३१ जानेवारीपर्यंत सधी आहे.