नाशिक जिल्ह्यात आज, उद्या अतिवृष्टीचा इशारा
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई येथील प्रादेशिक मौसम विज्ञान केंद्राच्या सूचनेनुसार 24 ते 28 सप्टेंबर या दिवसांत नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यासह काही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.
याअनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी 28 सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीच्या काळात खबरदारी बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत डोईफोडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, प्रादेशिक मौसम विज्ञान केंद्राच्या सूचनेनुसार 27 व 28 सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
या अनुषंगाने जिल्ह्यात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्व पूर प्रवण क्षेत्रातील गावांनी सावधानतेच्या अनुषंगाने नदी-नाले काठच्या परिसरातील लोकांनी सतर्क राहावे. तसेच नदी व धरण पात्रात कोणी उतरू नये, त्याचप्रमाणे आपले पशुधन, वाहने सुरक्षित स्थळी ठेवावीत. अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने सर्व पूर प्रवण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांनी केले आहे.