दिवसा ढवळ्या महिलेची तीन तोळ्याची सोन्याची पोत खेचली
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोनसाखळी चोरांचा पुन्हा एकदा सूळसुळाट झाला आहे. दिवसा ढवळ्या असले प्रकार होत असल्यामुळे आता या चोरांना पोलिसांचे भय राहिले नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. असाच एक प्रकार पंचवटीतील साई नगर येथे घडला आहे.
अमृतधाम पंचवटी येथे राहत असलेल्या सौ. सुमन अशोक गुंजाळ (५५) ह्या सोमवारी (दि. १२ जुलै) दुपारी सव्वा तीन च्या सुमारास साई नगर पंचवटी येथून भाजीपाला घेऊन पायी जात असताना, अंदाजे २७ ते २८ वयाचे २ युवक मोटारसायकल वर आले. यातील मागे बसलेल्या व्यक्तीने गुंजाळ यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची (अंदाजे ७५ हजार रुपये किमतीची) सोन्याची पोत ओढली आणि पसार झाले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुंजाळ यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बऱ्यापैकी वर्दळ असलेल्या रस्त्यावर भर दिवसा असे प्रकार घडत असल्याने पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.