महत्वाची बातमी: … अन्यथा दर आठवड्याला या दिवशी पाणी पुरवठा बंद…

महत्वाची बातमी: … अन्यथा दर आठवड्याला या दिवशी पाणी पुरवठा बंद…

नाशिक (प्रतिनिधी): जून महिन्यातच प्रशासनाने गंगापूरसह मुकणे व दारणा धरणातील पाणी स्थिती लक्षात घेत पाणी कपातीबाबत सूचना दिल्यानंतरही हा प्रस्ताव फेटाळणाऱ्या सत्ताधारी भाजपने आता शहरासाठी मंजूर असलेल्या आरक्षणापैकी केवळ तीन दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असल्याचे बघून तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कान टोचल्यानंतर रविवारपर्यंत मुसळधार पाऊस न झाल्यास परिस्थिती लक्षात घेत आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. पावसाने ओढ दिली तर पुढील आठवड्यापासून बुधवारी शहरात एक दिवस पूर्णपणे पाणी बंद अर्थातच ड्राय डे असणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याचा खून करणाऱ्या संशयिताला कोठडी

महापालिका क्षेत्रासाठी गंगापूर, दारणा तसेच मुकणेतून पाणीपुरवठा होता. अंदाजे २० लाख लोकसंख्येच्या शहरासाठी सुमारे १४ दशलक्ष घनफूट प्रतिदिन पाण्याचा वापर केला जातो. दरवर्षी १५ ऑक्टोबर ते ३१ जुलैपर्यंतचा कालावधी गृहित धरून पाणी आरक्षण निश्चित केले जाते.

त्यानुसार या २९० दिवसांसाठी सुमारे साडेपाच हजार दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण निश्चित करण्यात आले. यात गंगापूर धरणातून ३८००, दारणातून ४०० तर मुकणेतून १३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मंजूर झाले. मात्र, कोरोनामुळे पाण्याचा वाढलेला पाणी वापर तसेच अन्य कारणांमुळेही अतिरिक्त पाणी वापर झाल्याची बाब लक्षात घेत पाणीपुरवठा विभागाने जूनच्या सुरुवातीलाच याच पद्धतीने पाणी वापर सुरू राहिला तर १५ जुलैपर्यंतच पाणीसाठा पुरेल असा इशारा दिला होता.

हे ही वाचा:  नाशिक: चोरीच्या ४ मोटार सायकलसह २ चोरटे गजाआड

त्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांचे म्हणणे ऐकून घेत जुलै महिन्यात पावसाची परिस्थिती बघून पाणी कपातीबाबत निर्णय घेऊ असे सांगितले होते, मात्र जवळपास जून महिनाच कोरडा गेल्यानंतर आता अक्षरश: टंचाईची धग वाढली असून ही बाब कानावर गेल्यानंतर पालकमंत्री भुजबळ यांनी महापालिकेचे कान टोचत पाणी कपातीबाबत निर्णय घ्या असे सूचित केले होते. त्यानुसार महापौर कुलकर्णी यांनी सोमवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता, उदय धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत आदी उपस्थित होते. एकूणच आढावा घेतल्यानंतर रविवारपर्यंत किती पाऊस पडतो हे बघून पुढील आठवड्यापासून पाणी कपात करायची का याचे नियोजन केले जाणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790