नाशिक शहरात आढळले डेंग्यूचे इतके रुग्ण..

नाशिक शहरात आढळले डेंग्यूचे इतके रुग्ण..

नाशिक (प्रतिनिधी): पावसाळा सुरू झाला नाही तोच शहरात वाढत्या डासांच्या साम्राज्यामुळे डेंग्यू व चिकुनगुनियासारख्या आजारांनी डोके वर काढले असून चिकुनगुनियाचे ८५ तर डेंग्यूचे ८८ रुग्ण आढळले आहेत. तापाचे सर्वाधिक ३७५ रुग्ण आढळले आहेत. शहरात स्वच्छता ठेका व पेस्ट कंट्रोल योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे आरोग्य समस्या वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत नाही तोच आता चिकुनगुनिया, डेंग्यू यासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. २०१३ ते २०१९ या काळामध्ये पावसाळ्यामध्ये डेंग्यूने त्रस्त केल्याचे नाशिकमध्ये बघायला मिळाले.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे वैद्यकीय विभागाने सुटकेचा निश्वास सोडला असताना आता, कीटकजन्य किंबहुना डासांशी संबंधित आजारांचे रुग्ण वाढत असल्याची बाब आरोग्य व्यवस्थेला धोक्याचा इशारा देणारी आहे. सिडकोतील दत्तनगर व सातपूरमधील श्रमिकनगर व गंगापूर गाव या भागात चिकुनगुनिया व डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: पुढील पाच दिवस राज्यातील तापमानात होणार अंशतः वाढ

ही साथ नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागाने तीन भागांमध्ये प्रत्येकी ५ या प्रमाणे १५ पथकांची स्थापना केली आहे. दरम्यान, जानेवारी ते मे पर्यंत शहरात डेंग्यूचे ४१ रुग्ण आढळले असून जून महिन्यातच तब्बल ४० डेंग्यूचे रुग्ण वाढल्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांची ८१ वर पोहाेचली आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात डेंग्यूचे ३०७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात डेंग्यूचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. चिकुनगुनियाचे आतापर्यंत ८५ रुग्ण आढळले असून २६२ संशयित रुग्ण आढळले आहेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये डेंग्यूच्या भीतीचे वातावरण पसरले अाहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790