शाब्बास पठ्ठे: घंटागाडीच्या कचऱ्यात गेलेली सोन्याची अंगठी कर्मचाऱ्यांनी परत आणून दिली !
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक 02 मधील नांदुर गाव, निसर्ग नगर येथे केरकचरा संकलनाकरीता महानगरपालिकेची घंटागाडी नेहमी प्रमाणे गेली. सदर परिसरातील नागरीकांनी घंटागाडीत कचरा जमा केला. त्यापैकी सौ. शिला भालेराव यांनी देखील घरातील कचरा घंटागाडीत देऊन त्या घरी परतल्या.
काही वेळाने त्यांच्या लक्षात आले की, त्यांची सोन्याची अंगठी घरात आढळून आली नाही. त्यांनी शोधाशोध केली. तथापि, अंगठी न सापडल्याने त्यांना असे वाटले की, कचऱ्यात अंगठी गेली असावी. त्यांनी तातडीने सदर प्रभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता मुकादम बाळू रखमाजी जगताप यांचेशी संपर्क साधला व सोन्याची अंगठी कचऱ्यात गेली असावी अशी शक्यता बोलून दाखविली.
जगताप यांनी तत्काळ सदर घंटागाडी वाहनाचे ट्रॅकिंग करून सदरची घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना घंटागाडी हजेरी शेडवर घेऊन येण्यास सांगितले. घंटागाडी वाहन आल्यानंतर कचऱ्याची तपासणी करून सदर महिलेने दिलेल्या कचऱ्याचे पिशवीची ओळख पटवून त्यातील कचरा बाहेर काढला असता त्यात सोन्याची अंगठी आढळून आली. सदर अंगठीची ओळख पटवून सौ.भालेराव यांना सुपुर्द करणेत आली.
सदरच्या घटनेची सर्वत्र चर्चा होत असून, नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी बाळू रखमाजी जगताप यांच्या कर्तव्य तत्परतेमुळे एका महिलेस तिची सोन्याची अंगठी परत मिळाली. सदर घटनेची दखल घेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी जगताप यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.