नाशिक (प्रतिनिधी): स्थानिक व उपरे असा वाद उकरून काढत भाजप नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा प्रकार जेलरोड येथील प्रभाग क्र. १८ मध्ये शुक्रवारी (दि. ४) उघडकीस आला. याबाबत नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे..
नाशिकरोड पोलिसांनी दिलेली माहिती व सुनील पोपटराव धोंगडे यांच्या फिर्यादीनुसार प्रभाग क्र. १८ मधील भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या कार्यालयावर शुक्रवारी रात्री सव्वाआठला स्थानिक गुंडांनी हल्ला करत तोडफोड केली. विशाल संगमनेरे हे बाहेरून येऊन येथे नगरसेवक झाले आहेत. ते उपरे आहेत, असे जेलरोड येथील अमोल बोराडे व त्याचे सहकारी वारंवार हिणवत असतात. मात्र त्याकडे संगमनेरेंनी दुर्लक्ष केले आहे. चार दिवसांपूर्वीच संगमनेरेंकडे काम करणाऱ्या राहुल बेरड याच्या इनोव्हा कारची काच अमोल बोराडे (रा. भैरवनाथनगर, जेल रोड) याने फोडली होती. तेव्हापासून राहुल बेरड व अमोल बोराडे यांच्या मित्रांमध्ये बाचाबाची सुरू होती.
यातच अमोल बोराडेने संगमनेरे यांच्या कार्यालयातील फलकाची शुक्रवारी रात्री तोडफोड केली. याप्रकरणी ऋषिकेश ऊर्फ तात्या चौधरी, सचिन डांगे, अमोल बोराडे, आदित्य बोराडे, निखिल बोराडे व त्यांचे सहा साथीदार (रा. सर्व जेलरोड, बोराडे मळा ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.