नाशिक (प्रतिनिधी): महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ मधील नाशिक रोड शहर उपविभाग अंतर्गत असलेल्या एकलहरे १३२/३३ उपकेंद्रातून निघणाऱ्या नाशिक १ आणि २ या ३३ केव्ही वाहिन्यांचा तसेच पंचक या विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व वाहिन्यांचा वीज पुरवठा देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी शनिवार २९ मे २०२१ रोजी दुपारी ११ ते २ वाजता या वेळेत बंद राहणार आहे, तरी ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीसाठी विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यासह नियोजन करून इतर महत्वाची कामे केली या वेळेत केली जाणार आहेत. त्यामुळे पंचक या ३३/११ केव्ही उपकेंद्रातून निघणाऱ्या शहर १, शहर २, साइट्रिक, मोटवणे, प्रेस, न्यू पॉलिटेक्निक, सिन्नर फाटा, गोरेवाडी, मनपा एक्सप्रेस या ११ केव्ही वाहिन्यांवरील भागाचा पुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये जेलरोड परिसर, दसक, पंचक, कॅनॉल रोड, सिन्नर फाटा, चेहेडी, गोरेवाडी, न्यू पॉलीटेकनीक आणि नारायणबापू नगर या भागांचा प्रामुख्याने समावेश आहे.
याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देतांना सांगितले, “दरवर्षी महावितरणकडून मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातात. यामध्ये विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यांसह नियोजन करून इतर महत्वाची कामे केली जातात, जेणेकरून पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. सदर कामे गतीने सुरू असून त्यामुळे ग्राहकांची तात्पुरती गैरसोय होत असली तरी, पावसाळ्यामध्ये ग्राहकांना अखंडीत वीज मिळावी म्हणूनच ही कामे केली जातात.” तरी सदर भागातील ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर-२ विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.