नाशिक (प्रतिनिधी): पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा दि.16 ऑगस्ट 2021 पासून घेण्याचे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
उन्हाळी सत्र 2021 मधील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा संदर्भात विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रभारी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरव विजय, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठाचे प्रति-कुलपती अमित देशमुख यांनी सांगितले की, विद्यापीठाची उन्हाळी सत्र 2021 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा दि. 24 जून 2021 पासून नियोजित करण्यात आली होती. कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे परीक्षेच्या तयारीकरीता विद्यार्थ्यांना 45 दिवसांचा कालावधी मिळेल.
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कोविड-19 आजारासंबंधी शासनाने निर्देशित केलेल्या सर्व सुरक्षिततेचे नियम पाळुन घेण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी ई-पास म्हणुन विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे प्रवेशपत्र वितरीत केले जाणार आहे, त्यालाच ई-पास ऐवजी मान्यता देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिली आहे, परंतू लेखी परीक्षा दिल्यानंतर व प्रात्यक्षिक परीक्षेआधी ज्या विद्यार्थ्यांचा कोविड-19 अहवाल सकारात्मक आला आहे, अशा विद्यार्थ्यांची विलगीकरण कालावधीनंतर स्वतंत्रपणे त्याच प्रात्यक्षिक परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येतील. तसेच जे विद्यार्थी लेखी परीक्षेआधी कोविड-19 अहवाल सकारात्मक आल्यामुळे लेखी परीक्षेस बसु शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांची पुर्नःपरीक्षा घेण्याबाबत सर्व संबंधितांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या ऑनलाईन बैठकीस उपस्थितांचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात सविस्तर माहिती व वेळापत्रक लवकरच विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात येणार आहे.