नाशिक (प्रतिनिधी): गावठी कट्टे विक्री करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने फर्नांडिसवाडी, जयभवानीरोड येथे ही कारवाई केली. संशयितांकडून चार गावठी कट्टे, आठ जिवंत राउंड जप्त करण्यात आले. प्रशांत नाना जाधव, सागर किसन कोकणे, दर्शन उत्तम दोंदे, राहुल संदीप सोनवणे या संशयितांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखा पथक गस्त करत असताना सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे याने उंबरटी (मध्य प्रदेश) येथून चार गावठी कट्टे व पिस्टल विक्री करण्यासाठी आणले असल्याची माहिती पथकाचे मनोज डोंगरे, राहुल पालखेडे यांना मिळाली. पथकाने संशयिताचा माग काढला जयभवानीरोड येथे सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून एमएच १५ सीएस ९२९२ कार आणि एक गावठी कट्टा जप्त केला. अधिक चौकशीत प्रशांत नाना जाधव, दर्शन उत्तम दोंदे, राहुल सोनवणे यांची नावे सांगितली. पथकाने संशयितांच्या घरी छापा मारत तीन गावठी कट्टे जप्त केले. पोलिस उपआयुक्त संजय बारकुंड, सहायक आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.