नाशिक(प्रतिनिधी): लॉकडाऊन आणि संचारबंदी काळात १७ एप्रिल २०२० रोजीच्या पत्रानुसार जिल्ह्यातील मिठाई व फरसाण उत्पादक व विक्रेत्यांना उत्पादन व पार्सल सेवा देण्यास नियम व अटींच्या आधीन परवानगी देण्यात आली होती. परंतु विक्रेते व उत्पादकांनी नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडी ठेवून आपल्या उत्पादनांची सुटी विक्री करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निर्देशनास आले.
या अनुषंगाने मिठाई व फरसाण उत्पादक व विक्रेते यांची परवानगी स्थगित करण्यात आली असल्याचे अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभागाचे सह आयुक्त चं. दौ. सांळुखे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील मिठाई आणि फरसाण विक्रेत्यांना अन्न औषध प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत पार्सल सेवेने व्यवसाय करण्यास परवानगी दिली होती. मात्र काही विक्रेत्यांनी आपली दुकाने सुरू करून या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित विभागाने उत्पादक, विक्रेत्यांना या आधी देण्यात आलेली परवानगी रद्द केली आहे. संबंधित विक्रेत्यांनी, व्यावसायिकांनी आपले व्यवसाय त्वरीत बंद करावेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत.