नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील बालरोगतज्ञ यांनी त्यांच्या रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी कोरोना रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान बालकांवर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली असून बिटको रुग्णालयात १०० बेडचे रुग्णालय सुरू करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागास देण्यात आल्या आहेत.
तसेच नाशिक शहरातील बालरोगतज्ञ त्यांच्याकडे असणाऱ्या रुग्णालयांमध्ये त्यांच्याकडे असणाऱ्या एकूण बेड संख्येच्या २५ टक्के बेड कोरोना बाधित बाल रुग्णांसाठी आरक्षण ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. जर रुग्ण संख्या वाढल्यास टप्प्याटप्प्याने त्या बेडच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचना यावेळी आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.
यावेळी बालरोग तज्ञ यांच्या कडून शहरातील हॉस्पिटलची संख्या,बेड व त्यांच्याकडे उपलब्ध असणारे व्हेंटिलेटर याबाबतची माहिती या बैठकीत घेण्यात आली.यावेळी या सदस्यांनीही विविध मुद्दे मांडले. ज्या हॉस्पिटल कडे ५० बेड किंवा त्यापेक्षा जास्त बेडची व्यवस्था आहे त्यांनी स्वतंत्र ऑक्सीजन प्लांट तयार करावेत. मनपाच्या सी.बी.आर.एस. सिस्टीम वारंवार अपडेट करून सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी जेणे करून मनपा प्रशासनाकडून जी वेळोवेळी खाजगी रुग्णालयांना मदत अपेक्षित आहे ती त्या प्रमाणात करता येणे शक्य होणार आहे.
त्यामुळे सर्वांनी सीबीआय सिस्टीम अपडेट करण्याच्या सूचना यावेळी बैठकीत देण्यात आल्या भविष्यातील नियोजन म्हणून लहान बालकांना कोरोना झाल्यास कोणत्या पद्धतीचे उपचार करावेत त्यांना कोणत्या व्हँक्सीन द्यावे किंवा त्याबाबतच्या उपचाराचा प्रोटोकॉल याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, कोरोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड,सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत शेटे, मनपाचे बालरोगतज्ञ डॉ.बाजी, आय.एम.ए संघटनेचे अध्यक्ष हेमंत सोननिस, सचिव कविता गाडेकर, पेडाट्रिक असोसिएशनच्या सचिव रीना राठी यांच्यासह सह्याद्री हॉस्पिटल,व्होकार्ड हॉस्पिटल,सुयोग हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, अशोका हॉस्पिटल, गाडेकर मँटरनेटी होम आदी हॉस्पिटलचे सदस्य या बैठकीस उपस्थित होते.